Strait of Hormuz: मध्यपूर्वेतील वाढता तणाव निवळण्यासाठी इराणने अमेरिकेसमोर एक नवा प्रस्ताव मांडला आहे. मात्र, इराणच्या राजनैतिक हालचालींमुळे, विशेषतः रशिया दौऱ्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रचंड संतापले आहेत. ट्रम्प यांनी इराणला स्पष्ट शब्दांत बजावले आहे की, पुढील 3 दिवसांत ठोस निर्णय न झाल्यास इराणच्या तेल पाइपलाइनच्या पायाभूत सुविधा नष्ट केल्या जातील. या अल्टिमेटममुळे मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे.
इराणचा दोन टप्प्यांचा शांतता प्रस्ताव
इराणने अमेरिकेच्या व्हाईट हाऊसकडे औपचारिकपणे दोन टप्प्यांची योजना सादर केली आहे. या प्रस्तावानुसार, पहिल्या टप्प्यात अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील नाकेबंदी तात्काळ उठवावी आणि नौदलाने लादलेले सागरी निर्बंध हटवावेत, अशी मागणी इराणने केली आहे. याशिवाय, सध्याची शस्त्रसंधी वाढवण्यात यावी किंवा संघर्ष पूर्णपणे थांबवण्यात यावा, असे इराणचे म्हणणे आहे. दुसऱ्या टप्प्यात, परिस्थिती सामान्य झाल्यावर अण्वस्त्रे आणि अणुकराराशी संबंधित वाटाघाटींना सुरुवात होईल. "जोपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी खुली होत नाही, तोपर्यंत कोणताही संवाद शक्य नाही," अशी ताठर भूमिका इराणने घेतली आहे.
इराणच्या उप-परराष्ट्रमंत्र्यांचा धावता दौरा आणि रशिया भेट
अमेरिकेसोबतच्या वाटाघाटी रखडलेल्या असतानाच इराणचे उप-परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी अवघ्या 24 तासांत पाकिस्तान, ओमान आणि रशियाचा दौरा केला आहे. रविवारी त्यांनी पाकिस्तानात पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख फील्ड मार्शल मुनीर यांची भेट घेतली. त्यानंतर ते तातडीने रशियाला रवाना झाले असून, सोमवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भेट घेणार आहेत. इराणच्या या रशिया दौऱ्यामुळे ट्रम्प प्रशासन कमालीचे अस्वस्थ झाले आहे.
ट्रम्प यांचा इशारा: '3 दिवसांत करार करा, अन्यथा तेल रोखू'
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणला चर्चेसाठी स्वतःहून फोन करण्याचे आवाहन केले असले तरी, त्यांच्या अटींबाबत कोणतीही तडजोड करण्यास नकार दिला आहे. इराणच्या रशिया भेटीवर तीव्र आक्षेप घेत ट्रम्प म्हणाले की, "जर 3 दिवसांच्या आत इराणने अटी मान्य करून करार केला नाही, तर इराणला तेल निर्यात करणे कायमचे अशक्य करू." नाकेबंदीमुळे आधीच इराणची तेल निर्यात विस्कळीत झाली आहे, मात्र आता ट्रम्प यांनी थेट तेल पाइपलाइन्स उडवून देण्याची धमकी दिली आहे.
हेही वाचा – Sheikh Yousuf Afridi Killed : लष्कर-ए-तैयबाचा कमांडर दहशतवादी शेख यूसूफ आफ्रिदीचा पाकिस्तानात खात्मा
वाटाघाटींमधील पेच कायम
अमेरिकेने अद्याप इराणच्या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. उलट, "अमेरिका इराणला कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्रे विकसित करू देणार नाही," यावर ट्रम्प यांनी पुनरुच्चार केला आहे. इराणने सुरक्षेची हमी, आर्थिक नुकसानभरपाई आणि नवीन कायदेशीर चौकट देण्याची मागणी केली आहे, ज्याला अमेरिकेने अद्याप दाद दिलेली नाही. आता सर्वांचे लक्ष ट्रम्प यांनी दिलेल्या 3 दिवसांच्या मुदतीकडे लागले आहे.