Sinnar Rain Update: सिन्नर तालुक्याच्या पूर्व पट्ट्यात मंगळवारी दुपारच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. यामध्ये वडांगळी, देवपूर, मेंढी, फर्दापूर, धारणगाव आणि आसपासच्या गावांमधील नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला. सलग 2 दिवस वेगवेगळ्या भागात कोसळणाऱ्या या पावसामुळे बळीराजा कमालीचा आनंदी झाला असून, संपूर्ण शेतशिवारात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांनी चक्क नाचून या पहिल्या पावसाचे जल्लोषात स्वागत केले.
ग्रामीण भागात जलसाठ्यांमध्ये वाढ
पूर्व भागात मुसळधार पाऊस सुरू असताना, सिन्नर मुख्य शहरात मात्र दिवसभर केवळ ढगाळ वातावरण बनले होते. दुपारी शहरात केवळ हलक्या सरी कोसळल्या, ज्यामुळे मुख्य शहराला अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, ग्रामीण भागातील पावसामुळे सखल रस्ते जलमय झाले असून छोटे ओढे, नाले आणि इतर जलस्रोतांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. परिसरातील गुरेवाडी भागातही पावसाने चांगली हजेरी लावली.
जूनअखेर चिंतेचे ढग सरले, पण दमदार पावसाची अजूनही गरज
चालू वर्षातील जून महिना संपत आला तरी तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने ग्रामीण भागातील शेतकरी चिंतेत ग्रासला होता. मात्र, पूर्व पट्ट्यातील या ताज्या पावसामुळे आता शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. असे असले तरी, केवळ 1 ते 2 दिवसांचा पाऊस शेतीसाठी पुरेसा नसून, पेरण्या योग्य होण्यासाठी आगामी काळात सातत्यपूर्ण आणि मोठ्या पावसाची नितांत गरज असल्याचे मत स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. तालुक्यात सर्वदूर चांगला पाऊस झाल्यास शेतीसोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास मोठी मदत होणार आहे.