Fight in Wedding Viral Video Jalna : लग्नकार्यात आनंदाचे, मस्करीचे आणि उत्साहाचे वातावरण असणे स्वाभाविक आहे, परंतु एका विवाह सोहळ्यात हा आनंद काही वेळातच विरला. नवरदेवाचे बूट लपवण्याच्या खेळावरून सुरू झालेला वाद इतका विकोपाला गेला की, त्याचे रूपांतर थेट मोठ्या हाणामारीत झाले. नवरीच्या बहिणींनी बूट लपवून पैशांची मागणी केली होती, मात्र याच पैशांच्या व्यवहारावरून दोन्ही बाजूंच्या पाहुण्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. या वादाने उग्र रूप धारण केल्यामुळे शुभकार्यासाठी सजलेला मंडप चक्क हाणामारीच्या आखाड्यात बदलला.
महिला आणि वृद्धांचाही राडा: व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
या घटनेचा सर्वात धक्कादायक पैलू म्हणजे केवळ तरुणच नव्हे, तर महिला आणि वृद्ध मंडळीही या वादात सामील झाली. व्हायरल व्हिडिओमध्ये महिला एकमेकींचे केस ओढताना आणि पुरुष एकमेकांवर लाथा-बुक्क्यांचा वर्षाव करताना दिसत आहेत. वयोवृद्ध पाहुण्यांनीही या राड्यात मागे न राहता एकमेकांना यथेच्छ चोप दिला. लग्नातील या राड्याचा व्हिडिओ yogesh_k_reporter_law_student या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला असून, आतापर्यंत तो 1,00,000 पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. ही घटना महाराष्ट्रातील जालन्यातील आहे.
नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया आणि चर्चा
हा व्हिडिओ इंटरनेटवर आल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी या भांडणाची खिल्ली उडवली आहे. तर काहींनी चिंतेने विचारले आहे की, “एवढं सगळं झाल्यावर नवरी सासरी गेली की माहेरीच राहिली?” काहींनी तिरकसपणे विचारले आहे की, “शेवटी बूट कोणाला मिळाले आणि पैशांचे काय झाले?” जालन्यातील या घटनेमुळे आता लग्नातील बूट लपवण्यासारख्या नसत्या प्रकारांच्या अतिरेकावर चर्चा सुरू झाली असून, गंमत म्हणून खेळल्या जाणाऱ्या खेळाने लग्नाचे रूपांतर कुस्तीत केल्याबद्दल आश्चर्यही व्यक्त केले जात आहे.