Thrissur Fireworks Blast: केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात फटाक्यांच्या एका कारखान्यात झालेल्या शक्तिशाली स्फोटात 8 जणांना आपला जीव गमवावा लागला असून अनेक जण जखमी झाले आहेत. आगामी 'त्रिशूर पूरम' उत्सवासाठी 'तिरुवंबाडी' गटाकडून फटाक्यांचे साहित्य तयार करण्याचे काम सुरू असताना ही दुर्दैवी घटना घडली. हा स्फोट इतका तीव्र होता की, त्याचा आवाज कित्येक किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला. सुरुवातीला स्थानिक रहिवाशांना हा भूकंप असल्याचा भास झाला, मात्र काही वेळातच परिसरात आग आणि दाट धुराचे लोट पसरले. यामुळे मदत आणि बचाव कार्यात सुरुवातीला मोठ्या अडचणी निर्माण झाल्या.
घटनास्थळावरून 13 जणांची सुखरूप सुटका
अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथके रुग्णवाहिकेसह तातडीने घटनास्थळी दाखल झाली. केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (KSDMA) दिलेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखालून आणि घटनास्थळावरून 13 जणांची सुखरूप सुटका करण्यात यश आले आहे. जखमींना त्रिशूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी 5 जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात (ICU) ठेवण्यात आले आहे. तर 2 जण सामान्य वॉर्डमध्ये उपचार घेत असून इतर 17 जणांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.
महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्येही फटाक्यांचे बळी
फटाक्यांच्या कारखान्यांमधील असुरक्षिततेमुळे केवळ केरळच नव्हे, तर इतर राज्यांतही जीवितहानीच्या घटना समोर आल्या आहेत. महाराष्ट्रातील पालघर येथे नुकत्याच झालेल्या एका स्फोटात 2 जणांचा मृत्यू झाला, तर 4 जण जखमी झाले. तसेच, तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यातील 'वनजा' कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात तब्बल 25 जणांनी आपला जीव गमावला आहे. मुथुमाणिकम यांच्या मालकीच्या या कारखान्यातील दुर्घटना ही अलीकडच्या वर्षांतील सर्वात मोठी औद्योगिक दुर्घटना मानली जात आहे. या लागोपाठ घडणाऱ्या घटनांमुळे फटाक्यांच्या कारखान्यांमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.