Female Officers Involved in Ashok Kharat Scandal : नाशिकमधील वादग्रस्त भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचे एकामागून एक धक्कादायक बाबी उलगडू लागल्या आहेत. आतापर्यंत राजकीय नेते किंवा त्यांच्या पत्नी या भोंदूगिरीच्या नादाला लागल्याचे समोर आले होते. आता त्याच्या पुढे जात चक्क सुशिक्षित, उच्चशिक्षित, उच्चपदस्थ महिला अधिकारीही खरातच्या जाळ्यात अडकल्याचे समोर आले आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार, दोन मोठ्या महिला अधिकारी खरातच्या दरबारात नियमित हजेरी लावत होत्या. इतकेच नाही, तर या महिला अधिकारी इतरही अनेक महिलांना खरातकडे घेऊन जात असत, ज्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती अधिकच वाढली आहे.
मोठ्या पदावरील महिलांच्या सहभागामुळे खळबळ
कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, अशा 2 वरिष्ठ महिला अधिकारीच या भोंदू बाबाच्या प्रभावाखाली होत्या, ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे. सध्या कायदेशीर कारणामुळे आणि सुरक्षेच्या दृष्टीने या महिला अधिकाऱ्यांची नावे सार्वजनिक करण्यात आलेली नाहीत. मात्र, या अधिकाऱ्यांनी खरातच्या ‘दरबारात’ केवळ स्वतःच हजेरी लावली नाही, तर खरातचे रॅकेट वाढवण्यासाठी मध्यस्थाची भूमिकाही निभावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे आता प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
तपास पथकाचा फास आवळला
अशोक खरातच्या उत्पन्नाचे स्रोत आणि त्याने केलेल्या फसवणुकीच्या मार्गांचा शोध घेण्यासाठी तपास पथकाने आता आपला मोर्चा खरातच्या संपर्कात आलेल्या सर्व महिलांकडे वळवला आहे. यामध्ये पीडित महिलांसोबतच खरातला मदत करणाऱ्या महिलांचीही चौकशी केली जाणार आहे. या तपासाच्या फेऱ्यात आता त्या 2 महिला अधिकारीही अडकण्याची शक्यता आहे. खरातने नेमक्या किती महिलांची आणि कशा प्रकारे फसवणूक केली, याचे धागेदोरे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
फसवणुकीचे रॅकेट आणि उत्पन्नाचे स्रोत
भोंदूगिरीच्या नावाखाली चालणाऱ्या या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी केली जाईल, असे संकेत पोलिसांनी दिले आहेत. खरातकडे येणाऱ्या महिलांची संख्या मोठी असून, त्यातून जमा होणारा पैसा नेमका कुठे वळवला जात होता, याचाही तपास केला जात आहे. विशेषतः महिला अधिकारी खरातकडे इतरांना का घेऊन जात होत्या आणि त्यामागे काही आर्थिक व्यवहार होते का, या कोनातूनही पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणामुळे भोंदूगिरीचा सामाजिक शाप किती खोलवर रुजलेला आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.