Monsoon Delay In Maharashtra: मान्सूनबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सर्वांचे लक्ष मान्सूनकडे लागले असताना मुख्यमंत्री कार्यालयाने महत्त्वाची माहिती दिली आहे. सध्या मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मात्र त्यानंतर मान्सूनच्या पुढील प्रवासाचा वेग कमी होण्याची शक्यता असून किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी पेरणीबाबत घाई करू नये
मान्सूनच्या आगमनास होत असलेल्या विलंबामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच शेतीची कामे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या माहितीनुसार, 15 जूनपर्यंत बियाणे पेरणीसाठी आवश्यक असलेला पुरेसा आणि सातत्यपूर्ण पाऊस राज्यात होण्याची शक्यता नाही. त्यामुळे सध्या पडणाऱ्या हलक्या किंवा वादळी पावसावर विसंबून पेरणी करण्याचे टाळावे, अन्यथा बियाण्यांचे नुकसान होऊ शकते.
विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसाचा अंदाज
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 15 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन विजांच्या कडकडाटासह किरकोळ स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो. मात्र हा पाऊस विखुरलेल्या स्वरूपाचा असेल. त्यामुळे शेतीच्या दृष्टीने आवश्यक असलेली ओलावा स्थिती निर्माण होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
उष्णतेचा प्रभाव कायम राहणार
पावसाचा वेग मंदावणार असल्याने राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. किमान 12 जूनपर्यंत विदर्भ आणि खानदेशात तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहू शकते. तर मराठवाड्यात तापमान 35 ते 40 अंश सेल्सिअसदरम्यान नोंदवले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून तात्काळ दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत.
कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचना
दरम्यान, कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाने शेतकरी आणि नागरिकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. वादळी किंवा अल्प स्वरूपाच्या पावसामुळे पेरणीची घाई करू नये, असे शेतकऱ्यांना सांगण्यात आले आहे. तसेच विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली, पत्र्याच्या शेडखाली किंवा उघड्या जागेत थांबणे टाळावे. विजेचे खांब, ट्रान्सफॉर्मर आणि विद्युत तारा यांच्यापासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
अनेक भागांसाठी यलो अलर्ट
सध्या मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये वादळी हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र पुढील 3 ते 4 दिवसांत दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर लक्षणीय वाढण्याची शक्यता कमी असल्याचे हवामान तज्ज्ञांनी म्हटले आहे. दरम्यान, राज्यातील बहुतांश भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून अनेक ठिकाणी केवळ हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.