El Nino Monsoon Prediction : यंदाच्या मान्सून हंगामावर 'एल निनो'चे सावट असणार असून, यामुळे संपूर्ण देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस आणि तीव्र उष्णतेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या 'नोआ' (NOAA) या संस्थेच्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने (CPC) वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्रपृष्ठाच्या तापमानात सलग 5 व्या महिन्यात मोठी वाढ नोंदवली गेली आहे. परिणामी, सध्या असलेली न्यूट्रल स्थिती संपून जून महिन्याच्या सुरुवातीलाच 'एल निनो' सक्रिय होण्याची शक्यता तब्बल 82 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. भारतामध्ये एकीकडे मान्सून दाखल होत असतानाच दुसरीकडे महासागरात निर्माण होणारी ही परिस्थिती हंगामी पावसाच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक मानली जात आहे.
हिवाळ्यातही राहणार प्रभाव; तीव्रतेबाबत हवामान संस्थांमध्ये मतभेद
उत्तर गोलार्धातील हिवाळ्याच्या काळात, म्हणजेच डिसेंबर 2026 ते फेब्रुवारी 2027 दरम्यान हा एल निनो 96 टक्के सक्रिय राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या एल निनोच्या तीव्रतेबद्दल वेगवेगळ्या जागतिक हवामान मॉडेल्समध्ये भिन्न मते आहेत. युरोपीय मॉडेलनुसार, समुद्रपृष्ठाचे तापमान सरासरीपेक्षा 3 अंश किंवा त्याहून अधिक वाढून हा इतिहासातील सर्वात तीव्र एल निनो ठरू शकतो. मात्र, 'सीपीसी'ने या अति-तीव्रतेबाबत थोडी साशंकता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान तापमान कमाल 1.5 ते 2.0 अंशांच्या दरम्यान वाढू शकते. यामध्ये जून-जुलैमध्ये क्षीण, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मध्यम, तर ऑक्टोबर महिन्यापासून पुढे तीव्र किंवा अतितीव्र स्वरूपाचा एल निनो पाहायला मिळू शकतो.
मोसमी वारे कमकुवत होणार; आशियाई देशांसमोर मोठे आव्हान
एल निनो सक्रिय झाल्यामुळे प्रशांत महासागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होते, ज्यामुळे भारतीय उपखंडाकडे येणाऱ्या मोसमी वाऱ्यांचा प्रवाह क्षीण (कमकुवत) होतो. या बदलत्या रचनेमुळे मान्सूनसाठी आवश्यक असणारे बाष्प पूर्वेकडे खेचले जाते आणि पर्यायाने भारतात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा खालावते. सध्या पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर आधीच मोठा ताण आलेला आहे. अशातच आता एल निनोच्या या नैसर्गिक संकटामुळे अन्नधान्य उत्पादन आणि पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागून आशिया खंडाच्या अर्थव्यवस्थेला आणखी मोठा फटका बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
हेही वाचा – Water Powered Cars: पेट्रोल-डिझेल सोडा, आता पाण्यावर धावणार वाहनं? जाणून घ्या काय आहे हे 'मॅजिक इंधन'
2027 चा उन्हाळा ठरणार विक्रमी; जागतिक तापमानात होणार वाढ
या हवामान बदलाचे दूरगामी परिणाम पुढील वर्षातही स्पष्टपणे जाणवतील. एल निनोच्या प्रभावामुळे वर्ष 2027 मध्ये जागतिक पातळीवर विक्रमी उच्चांकी तापमानाची नोंद होण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. भारतात या संकटानंतर येणारा 2027 चा उन्हाळा अत्यंत तीव्र स्वरूपाचा असेल, ज्यामध्ये उष्णतेच्या लाटांची (Heat waves) संख्या लक्षणीयरीत्या वाढेल. इतकेच नव्हे तर, या उष्णतेमुळे पुढील वर्षाच्या (2027 च्या) मान्सूनचे देशातील आगमन देखील लांबणीवर पडू शकते.
सागरी जैवविविधतेवर प्रतिकूल परिणाम
वाढत्या जागतिक तापमानाचा आणि महासागराच्या गरम होण्याचा थेट फटका केवळ जमिनीवरील मानवी जीवनालाच नाही तर सागरी परिसंस्थेलाही बसेल. समुद्राच्या पाण्याचे तापमान सातत्याने वाढत राहिल्यामुळे सामुद्री जैवविविधतेवर अत्यंत प्रतिकूल परिणाम होण्याची भीती हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अनेक सागरी जीव आणि जलचर वनस्पतींच्या अस्तित्वाचा प्रश्न यामुळे निर्माण होऊ शकतो.