Foreign Funding Case: महाराष्ट्रात सोमवारी सक्तवसुली संचालनालयाने (ED) मोठी कारवाई करत नंदुरबार आणि मुंबईतील एकूण 12 ठिकाणी एकाचवेळी छापेमारी केली. जामिया इस्माईलिया इशातुल उलूम (JIIU), येमेनी नागरिक अल-खादामी खालिद इब्राहिम सालेह आणि इतरांवर सुरू असलेल्या तपासाच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली. ईडीने हे छापे अक्कलकोट पोलीस ठाण्यात दाखल एफआयआर आणि त्यासंदर्भातील 11 एप्रिल 2025 रोजीच्या आरोपपत्रावर आधारित चौकशीचा भाग म्हणून केल्याचे सांगितले. तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात करण्यात आलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी शोधमोहीम मानली जात आहे.
परदेशी निधीच्या नियमांचे उल्लंघन
गृह मंत्रालयाने (MHA) 15 जुलै 2024 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, जामिया इस्माईलिया इशातुल उलूम ट्रस्टची FCRA नोंदणी रद्द करण्यात आली होती. मंत्रालयाच्या तपासात असे निष्पन्न झाले की ट्रस्टकडून परदेशी देणग्या एफसीआरए नोंदणी नसलेल्या स्वयंसेवी संस्थांना दिल्या जात होत्या, जे नियमांचे स्पष्ट उल्लंघन आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सध्या शोधमोहीमेमध्ये निधी नेटवर्क, व्यवहारांची कागदपत्रे, डिजिटल डेटा आणि महत्त्वाचे पुरावे मिळवण्यावर भर देण्यात येत आहे. परदेशी निधी नेमका कोणत्या कामासाठी वापरला गेला आणि यात कोणते अवैध आर्थिक व्यवहार झाले का, याचा शोध तपास संस्था घेत आहेत. येत्या काळात या प्रकरणात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया
या प्रकरणावर राजकीय स्तरावरही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक व्हिडिओ जारी करून जामिया इस्माईलिया इशातुल उलूमला 'महाराष्ट्राचे अल फलाह' असे संबोधले आहे. त्यांनी म्हटले की, आज सकाळपासून केंद्रीय तपास यंत्रणा नंदुरबारमध्ये छापे टाकत आहेत. जामिया इस्लामिया इशातुल उलूमच्या परिसरात मोठी कारवाई सुरू आहे. येथे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होतात. काही दिवसांत संपूर्ण सत्य समोर येणार आहे.