Mahadev Betting App Case: महादेव ऑनलाइन बेटिंग ॲप प्रकरणातील मनी लाँड्रिंगच्या तपासात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आतापर्यंतची सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय कारवाई केली आहे. या सट्टेबाजी सिंडिकेटचा मुख्य प्रमोटर सौरभ चंद्राकर याच्या दुबईतील तब्बल 1,700 कोटी रुपयांच्या मालमत्ता ED ने जप्त केल्या आहेत. तपासाची व्याप्ती आता जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या 'बुर्ज खलीफा'पर्यंत पोहोचली असून, सट्टेबाजीच्या काळ्या पैशातून उभारलेले हे साम्राज्य उद्ध्वस्त करण्यास सुरुवात झाली आहे.
दुबईच्या 'VVIP' भागात विलासी मालमत्तांचा शोध
ED ने दुबईतील अशा उच्चभ्रू भागांमधील मालमत्ता सीझ केल्या आहेत, जिथे राहणे अनेकांसाठी स्वप्न असते. यामध्ये बुर्ज खलीफा मधील एक लक्झरी फ्लॅट, हिल्स व्ह्यू, फेयरवे रेसिडेन्सी, सिद्रा आणि SLS हॉटेल अँड रेसिडेन्सेसमधील अपार्टमेंट्सचा समावेश आहे. सट्टेबाजीच्या अवैध कमाईतून या मालमत्ता विकास छापरिया, अतुल अरोरा आणि नितीन टिबरेवाल यांसारख्या साथीदारांच्या नावावर खरेदी करण्यात आल्या होत्या. या सिंडिकेटने हवाला आणि क्रिप्टोकरन्सीचा वापर करून भारतातून पैसा दुबईला वळवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
काय आहे 5,000 कोटींचा महादेव ॲप घोटाला?
छत्तीसगडच्या भिलाई येथील सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांनी दुबईतून हे सट्टेबाजीचे जाळे विणले होते. हे केवळ एक ॲप नसून पोकर, क्रिकेट, बॅडमिंटन आणि भारतीय निवडणुकांवर सट्टा लावणारे एक प्रचंड मोठे नेटवर्क होते. प्रमोटर्स एकूण नफ्यातील 70 ते 75 टक्के हिस्सा स्वतःकडे ठेवत, तर उर्वरित भाग पॅनेल ऑपरेटर्सना दिला जात असे. आतापर्यंत या घोटाळ्यातून 5,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम हवालाद्वारे परदेशात पाठवण्यात आल्याचा संशय असून, फसवणुकीसाठी हजारो बनावट बँक खात्यांचा वापर करण्यात आला आहे.
गुंतागुंतीचे 'फ्रेंचाइजी' मॉडेल आणि हवाला व्यवहार
हा सट्टेबाजीचा व्यवसाय 'पॅनेल' किंवा 'ब्रँच' या स्वरूपात फ्रेंचाइजी मॉडेलवर चालवला जात असे. सामान्य लोकांच्या KYC कागदपत्रांचा गैरवापर करून उघडलेल्या बँक खात्यांमध्ये सट्टेबाजीचे पैसे जमा केले जायचे. तिथून हे पैसे लेयरिंग करून दुबईत पाठवले जात. ED ने आतापर्यंत देशभरात 175 हून अधिक ठिकाणी छापे टाकले असून 13 जणांना अटक केली आहे. तसेच रायपूर न्यायालयात 74 आरोपींविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली असून एकूण 4,336 कोटींची मालमत्ता जप्त किंवा फ्रीज करण्यात आली आहे.
मुख्य आरोपींचा शोध आणि न्यायालयीन कठोरता
या प्रकरणातील दुसरा मुख्य आरोपी रवी उप्पल हा डिसेंबर 2023 मध्ये दुबईत पकडला गेला होता, परंतु तो तिथून पळून जाण्यात यशस्वी झाला. त्याने आता 'वानुआतू' (Vanuatu) देशाचे नागरिकत्व घेतल्याचे वृत्त आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत ED ला रवी उप्पलचा शोध घेण्याचे कडक निर्देश दिले आहेत. चंद्राकर आणि उप्पल यांनी परदेशात बसून भारतीय व्यवस्थेला दिलेले हे आव्हान मोडून काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कायदेशीर प्रयत्न अधिक तीव्र करण्यात आले आहेत.
हेही वाचा – LPG Extra Charge Bill: हॉटेल बिल भरण्यापूर्वी 'हे' वाचा; गॅस सरचार्जच्या नावाखाली तुमची लूट तर होत नाही ना?