Sudan Drone Attack: सुदानमध्ये विस्थापितांच्या ताफ्यावर ड्रोन हल्ला; आठ मुलांसह 24 जणांचा करुण अंत

मध्य सुदानमध्ये रॅपिड सपोर्ट फोर्सेस (RSF) या निमलष्करी गटाने विस्थापित कुटुंबांना घेऊन जाणाऱ्या एका वाहनावर मोठा ड्रोन हल्ला केला.

Sudan Drone Attack: सुदानमध्ये विस्थापितांच्या ताफ्यावर ड्रोन हल्ला; आठ मुलांसह 24 जणांचा करुण अंत

Sudan Drone Attack: सुदानमधील सत्तासंघर्षाने आता अत्यंत भीषण वळण घेतले आहे. शनिवारी मध्य सुदानमध्ये रॅपिड सपोर्ट फोर्सेस (RSF) या निमलष्करी गटाने विस्थापित कुटुंबांना घेऊन जाणाऱ्या एका वाहनावर मोठा ड्रोन हल्ला केला. या अमानुष हल्ल्यात 8 मुलांसह किमान 24 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 'सुदान डॉक्टर्स नेटवर्क' या संस्थेने या घटनेची पुष्टी केली असून, मृतांमध्ये दोन लहान बालकांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

जीव वाचवण्यासाठी पळून जाणाऱ्यांना केले लक्ष्य
हा हल्ला उत्तर कोर्डोफान प्रांतातील राहाद शहराजवळ झाला. उत्तर कोर्डोफानच्या दुबेकर भागात सुरू असलेल्या भीषण लढाईतून जीव वाचवण्यासाठी काही कुटुंबे वाहनातून सुरक्षित ठिकाणी पळून जात होती. मात्र, वाटेतच या विस्थापितांच्या वाहनाला लक्ष्य करण्यात आले. डॉक्टरांच्या गटाने या कृत्याचा तीव्र निषेध केला असून, आंतरराष्ट्रीय समुदाय आणि मानवाधिकार संघटनांना नागरिकांचे रक्षण करण्यासाठी त्वरित पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. तसेच, या मानवी हक्कांच्या उल्लंघनासाठी RSF नेतृत्वाला थेट जबाबदार धरण्याची मागणीही करण्यात आली आहे.

2023 पासून सुदानमध्ये लष्करी अराजक
एप्रिल 2023 मध्ये सुदानी सैन्य आणि निमलष्करी गट (RSF) यांच्यातील सत्तासंघर्षाचे रूपांतर उघड युद्धात झाले. तेव्हापासून सुदानमध्ये अराजक माजले आहे. गेल्या तीन वर्षांपासून हा गट देशाच्या नियंत्रणासाठी लष्कराशी लढत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, या विनाशकारी युद्धात आतापर्यंत 40 हजारहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. मात्र, प्रत्यक्ष मृतांची संख्या यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असण्याची भीती मदत गटांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – Indians In America: ट्रम्प यांचा भारतीयांना 'दे धक्का'; या' एका निर्णयाने अमेरिकेतून 3800 भारतीयांची हकालपट्टी

जगातील सर्वात मोठे मानवतावादी संकट
या सततच्या युद्धामुळे सुदानमध्ये जगातील सर्वात मोठे मानवतावादी संकट निर्माण झाले आहे. 1.4 कोटींहून अधिक लोक आपल्या घरातून विस्थापित झाले असून, देशाच्या अनेक भागांत दुष्काळ आणि रोगराईचा प्रादुर्भाव वाढला आहे. विस्थापित छावण्यांमध्येही नागरिकांना सुरक्षितता मिळत नसल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. या ताज्या हल्ल्यानंतर RSF कडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र अशा हल्ल्यांमुळे सुदानमधील सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number