Mumbai BEST Strike : मुंबईमध्ये बेस्ट (BEST) कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपामुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावातून एका बस चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सागर मुंडे असे या मृत चालकाचे नाव असून, ते मालवणी बेस्ट बस डेपोमध्ये कार्यरत होते. बेस्ट समितीच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंडे यांचा मृत्यू संपाच्या आणि कामाच्या प्रचंड तणावामुळेच झाल्याचा थेट आरोप केला आहे.
15 ते 16 वर्षांची प्रदीर्घ सेवा
मृत सागर मुंडे हे बेस्ट प्रशासनाचे एक जुने आणि अनुभवी कर्मचारी होते. त्यांनी गेली 15 ते 16 वर्षे अत्यंत प्रामाणिकपणे बेस्टचे चालक म्हणून सेवा दिली होती. मुंबईकरांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या बेस्टच्या सेवेत इतका प्रदीर्घ काळ योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्याचा असा तणावाखाली मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. या घटनेमुळे सर्वसामान्य कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा – BEST Strike: विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी संपावर, ऐन कामाच्या दिवशी मुंबईकरांचे हाल
संपामुळे वाढला होता मानसिक ताण
सध्या बेस्ट प्रशासनाविरोधात कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे डेपोमधील वातावरण प्रचंड दबावाखाली होते. मागण्या पूर्ण न होणे आणि कामाची अनिश्चितता यांमुळे चालकांवर मोठ्या प्रमाणावर मानसिक ताण आला असल्याचा दावा संघटनांकडून केला जात आहे. सागर मुंडे यांच्या अचानक जाण्याने मालवणी डेपोतील कर्मचाऱ्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून, या मृत्यूला प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि संपाचा ताणच कारणीभूत असल्याचा पुनरुच्चार बेस्ट समितीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.