Hadapsar Canal Wall Collapse: पुण्याच्या हडपसर भागात मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण दुर्घटना घडली. मगरपट्टा सिटीच्या मागील गेटजवळ, मगरपट्टा ते कोरेगाव पार्कला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील कॅनॉलची भिंत अचानक फुटली. या घटनेमुळे कालव्यातील लाखो लिटर पाणी वेगाने रस्त्यावर आले, ज्यामुळे संपूर्ण परिसराला नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ऐन उन्हाळ्यात शहर पाणीटंचाईचा सामना करत असताना, अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी झाल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
वाहतूक ठप्प आणि घरांमध्ये शिरले पाणी
कॅनॉल फुटल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, मगरपट्टा ते कोरेगाव पार्क हा महत्त्वाचा मार्ग पूर्णपणे जलमय झाला आहे. यामुळे या भागातील वाहतूक पूर्णतः कोलमडली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. केवळ रस्तेच नव्हे, तर मगरपट्टा सिटीच्या अंतर्गत भागांतही पाणी शिरल्याची माहिती समोर आली आहे. या अनपेक्षित संकटामुळे स्थानिक रहिवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
प्रशासनाकडून पाणीपुरवठा बंद; दुरुस्तीचे काम सुरू
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने खडकवासला धरणातून कॅनॉलमध्ये सोडले जाणारे पाणी तातडीने बंद केले आहे. मात्र, कालव्यात आधीच असलेल्या पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने परिसरात अजूनही पाणी साचलेले दिसत आहे. महापालिका आणि संबंधित विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, भिंतीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.