DJ High Volume Impact on Poultry Farm Birds : कान किर्रर्र करणाऱ्या डिजेसमोर आनंदाने नाचणाऱ्यांपेक्षा किती तरी लोकांना त्याचा नाहक त्रास होत असतो. आवाजाच्या मर्यादा ठरवून दिल्या असल्या तरी त्या नियमांचे अनेक ठिकाणी उल्लंघन होते. पोलीस काय प्रत्येक ठिकाणी उपस्थित असतीलच असे नाही. डिजेचा सहन न होणारा आवाज पशु-पक्षांनाही भयंकर त्रास देत असतो, याचा प्रत्यय एका पोल्ट्री मालकाला आला असून त्याला आपल्या 140 कोंबड्या गमवाव्या लागल्या.
ही घटना उत्तर प्रदेशातील सुल्तानपूर जिल्ह्यात घडली आहे. वरातीमध्ये वाजणाऱ्या डीजेच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे एका पोल्ट्री फार्ममधील तब्बल 140 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. तेथील दरियापुर गावात ही घटना घडली असून पोल्ट्री फार्मचे मालक साबिर अली यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, बराच वेळ चाललेल्या डीजेच्या प्रचंड आवाजामुळे कोंबड्या प्रचंड घाबरल्या आणि थोड्याच वेळात त्यांनी तडफडून जीव सोडला.
प्रशासनाची कारवाई
या घटनेची गांभीर्याने दखल घेत येथील सुल्तानपूर पोलिसांनी परिसरातील डीजेवाल्यांना नोटीसा बजावल्या आहेत. ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन झाले आहे का आणि लाउडस्पीकर वाजवण्यासाठी रीतसर परवानगी घेतली होती का, याचा तपास सध्या अधिकारी करत आहेत. या दुर्घटनेनंतर जिल्ह्यात विनापरवाना डीजे चालवणाऱ्यांविरुद्ध मोठी मोहीम हाती घेण्यात आली असून प्रशासनाने नियम अधिक कडक करण्याचे संकेत दिले आहेत.
पशुवैद्यकीय तज्ज्ञ याबाबत सांगतात
पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, पक्षी हे आवाजाच्या तीव्रतेबाबत अत्यंत संवेदनशील असतात. मीडिया अहवालानुसार, कोंबड्यांचा या मृत्यूमागे 'एकॉस्टिक स्ट्रेस' (ध्वनीमुळे निर्माण झालेला तणाव) हे मुख्य कारण असू शकते. अचानक होणाऱ्या मोठ्या आवाजामुळे पक्ष्यांना धक्का बसतो किंवा कार्डियक अरेस्ट येऊ शकतो, विशेषतः पोल्ट्री फार्मसारख्या बंदिस्त जागी हा धोका अधिक असतो. याआधीही फटाक्यांच्या आवाजामुळे पाळीव प्राणी आणि पक्षी घाबरल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
सामाजिक जबाबदारीचे भान, नियमांची गरज
आवाजाच्या प्रदूषणाचा त्रास फक्त मानवापुरता मर्यादित नसतो, सुल्तानपूरच्या या घटनेने मुक्या प्राण्यांवरील त्याचे गंभीर परिणाम अधिक स्पष्ट केले आहेत. रहिवासी आणि संवेदनशील भागात डीजे वाजवण्यासाठी आवाजाची एक निश्चित सीमा ठरवून दिलेली असते, ज्याचे उल्लंघन केल्यास दंड किंवा साहित्य जप्त करण्याची तरतूद आहे. फक्त नियम म्हणून नव्हे, तर एक जबाबदारी म्हणून आवाजाची मर्यादा राखणे किती गरजेचे आहे, हे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.