Divyanka and Vivek Expecting Their First Baby : टेलिव्हिजन सृष्टीतील अत्यंत लाडकी जोडी म्हणून ओळखले जाणारे दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. लग्नाच्या जवळपास 10 वर्षांनंतर हे जोडपे आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत करण्यास सज्ज असल्याचे वृत्त आहे. जरी या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी, सोशल मीडियावर चाहत्यांनी या लाडक्या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे.
चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
विविध प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्यांका सध्या गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात असून लवकरच हे जोडपे आई-बाबा होणार आहे. दिव्यांका आणि विवेकची जोडी 'ये है मोहब्बतें' या मालिकेच्या सेटवर एकत्र आली होती. तिथूनच त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी 2016 मध्ये भोपाळ येथे मोठ्या थाटामाटात लग्नगाठ बांधली. लग्नानंतरच्या या 10 वर्षांच्या प्रवासात चाहत्यांनी या दोघांना नेहमीच भरभरून प्रेम दिले आहे, त्यामुळेच या गोड बातमीमुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे उधाण आले आहे.
हेही वाचा – Alia Bhatt: 'बेबी…!' वाढदिवशीच आलिया भट्टने चाहत्यांना दिला सुखद धक्का; 'राहा'नंतर नव्या पाहुण्याचं आगमन?
दिव्यांकाची सोशल मीडियापासूनची सुट्टी
गेल्या काही काळापासून दिव्यांका त्रिपाठी लाईमलाईटपासून आणि सोशल मीडियापासून थोडी दूर असल्याचे दिसून आले होते. नुकत्याच समोर आलेल्या काही फोटोंमध्ये ती सैल कपड्यांमध्ये तिचा 'बेबी बंप' लपवण्याचा प्रयत्न करताना दिसली, ज्यामुळे या चर्चेला अधिक उधाण आले. सूत्रांच्या माहितीनुसार, हे जोडपे सध्या हा खास काळ आपल्या जवळच्या नातेवाईकांसोबत खाजगीरित्या एन्जॉय करत आहे. तसेच, लवकरच एका खाजगी कार्यक्रमात 'डोहाळे जेवण' (Baby Shower) आयोजित करण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
करिअरमधील यशस्वी वाटचाल
दिव्यांका आणि विवेक या दोघांनीही टेलिव्हिजन क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दिव्यांकाने 'ये है मोहब्बतें' मधून घराघरात स्थान मिळवले, तर या जोडीने 'नच बलिये 8' (Nach Baliye 8) चे विजेतेपदही पटकावले होते. फॅमिली प्लॅनिंगबद्दल विचारले असता त्यांनी नेहमीच योग्य वेळ आल्यावर निर्णय घेण्याचे सांगितले होते. आता ती योग्य वेळ आली असून, हे जोडपे आपल्या आयुष्याच्या एका नवीन आणि सुंदर वळणावर उभे आहे. अधिकृत घोषणा कधी होणार, याची प्रतीक्षा आता सर्वांना लागली आहे.