Pandharpur VIP Darshan Ban: आषाढी एकादशीसाठी पंढरपुरात दाखल होणाऱ्या लाखो भाविकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय श्री विठ्ठलाचे दर्शन घेता यावे, यासाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. 15 जुलैपासून मंदिरातील व्हीआयपी दर्शन व्यवस्था पूर्णपणे बंद करण्यात आली असून, सर्वांसाठी समान दर्शनाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नव्या व्यवस्थेच्या पहिल्याच दिवशी काही ठिकाणी गोंधळाचे चित्र दिसून आले. काही वरिष्ठ नेत्यांना दर्शनासाठी प्रतीक्षा करावी लागली, तर काही लोकप्रतिनिधी मोठ्या लवाजम्यासह मंदिरात पोहोचल्याने वाद निर्माण झाला.
या घडामोडीनंतर सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. शासनाने निश्चित केलेल्या प्रोटोकॉलच्या बाहेर जाऊन कोणीही जबरदस्तीने विशेष दर्शन घेण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार थेट गुन्हा दाखल केला जाईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
प्रोटोकॉलनुसारच प्रवेश; मर्यादित व्यक्तींनाच परवानगी
प्रशासनाने लागू केलेल्या नव्या नियमांनुसार केवळ विद्यमान व माजी मंत्री, खासदार आणि आमदार यांनाच शासकीय शिष्टाचारानुसार मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. मात्र, अशा मान्यवरांसोबत फक्त 2 ते 3 व्यक्तींनाच गाभाऱ्यात जाण्याची परवानगी असेल. कार्यकर्ते, समर्थक किंवा मोठा ताफा घेऊन येणाऱ्यांना मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशांनंतर 15 जुलैपासून या नव्या व्यवस्थेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. प्रारंभी निर्माण झालेला गोंधळ लक्षात घेऊन पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांना नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
वाखरी पुलाची दुरुस्ती पूर्ण; पावसामुळे प्रशासनाला दिलासा
दरम्यान, वाखरी येथील नव्या पुलाच्या बाजूचा भाग पावसामुळे खचल्याने निर्माण झालेल्या चिंतेवरही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले. मुख्य पुलाला कोणताही धोका नसल्याचे सांगत त्यांनी खचलेल्या भागाची दुरुस्ती तातडीने पूर्ण झाल्याची माहिती दिली.
हेही वाचा – Dattatray Bharne: फडणवीस केंद्रात जाणार? मुख्यमंत्रिपदासाठी दत्तात्रय भरणे यांनी सुचवलं 'या' नेत्याचं नाव
याशिवाय पालखी तळावर पाणी साचण्याची समस्या कायम राहू नये म्हणून राष्ट्रीय महामार्ग विभागाला नव्या ड्रेनेज लाईनचे काम त्वरित सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वारीपूर्वीच जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने पाणीटंचाईची भीती कमी झाली असून, वारकऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब असल्याचेही प्रशासनाने नमूद केले आहे.