Director P Bharathiraja passes away: दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीला अनेक दिग्गज कलाकार देणारे आणि तमिळ सिनेमाची व्याख्या बदलणारे ज्येष्ठ चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते पी. भारतीराजा यांचे आज बुधवारी सकाळी चेन्नई येथील राहत्या घरी निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. वयोमानानुसार उद्भवलेल्या विविध आरोग्य समस्यांमुळे ते गेल्या काही काळापासून त्रस्त होते. त्यातच वर्ष 2025 मध्ये त्यांचा मुलगा आणि अभिनेता मनोज भारतीराजा यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते, ज्यानंतर भारतीराजा यांची तब्येत कमालीची खालावली होती.
श्रीदेवी आणि कमल हासन यांच्या कारकिर्दीला दिली नवी दिशा
भारतीराजा यांनी वर्ष 1977 मध्ये प्रदर्शित झालेल्या '16 वयथिनिले' या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात आपले पहिले पाऊल ठेवले होते. हा चित्रपट तामिळ चित्रपटसृष्टीच्या इतिहासात एक अत्यंत महत्त्वाचा मैलाचा दगड ठरला. या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी चित्रपटसृष्टीला अनेक मोठे स्टार्स दिले. या चित्रपटात कमल हासन आणि अभिनेत्री श्रीदेवी यांनी मुख्य भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. याच चित्रपटात सुपरस्टार रजनीकांत यांनी साकारलेली खलनायकाची भूमिका प्रचंड गाजली होती. या दिग्गजांना स्टार बनवण्याचे श्रेय प्रामुख्याने भारतीराजा यांच्या अचूक दिग्दर्शनाला दिले जाते.
स्टुडिओच्या भिंती तोडून कॅमेरा गावातील मातीत नेणारा दिग्दर्शक
ज्या काळात दक्षिण भारतात बहुतांश चित्रपटांचे चित्रीकरण केवळ बंदिस्त स्टुडिओच्या भिंती आणि भव्य सेटपुरते मर्यादित होते, त्या काळात भारतीराजा यांनी धाडसी प्रयोग केले. त्यांनी कॅमेरा थेट तमिळनाडूच्या खऱ्याखुऱ्या गावांमध्ये, हिरव्यागार शेतांमध्ये आणि तिथल्या अस्सल मातीत नेऊन वास्तववादी चित्रपट बनवण्यास सुरुवात केली. आपल्या चार दशकांहून अधिक काळ चाललेल्या कारकिर्दीत त्यांनी 40 हून अधिक ब्लॉकबस्टर चित्रपटांचे दिग्दर्शन केले, ज्यातील काही प्रमुख चित्रपट –
किझक्के पोगुम रेल (Kizhakke Pogum Rail)
सिगप्पू रोजक्कल (Sigappu Rozakkal)
अलायगल ओइवथिल्लै (Alaigal Oivathillai)
मुथल मरियाथाई (Muthal Mariyathai)
उत्कृष्ट अभिनयाचा ठसा आणि अखेरचा चित्रपट
चित्रपट दिग्दर्शनात आपला दबदबा निर्माण केल्यानंतर भारतीराजा यांनी एक परिपक्व अभिनेता म्हणूनही सिनेसृष्टीत उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांनी 'आयुथा एझुथु', 'थिरुचित्रंबलम' आणि दाक्षिणात्य चित्रपट 'महाराजा' यांसारख्या अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये आपल्या कसदार अभिनयाची छाप पाडली. अभिनेता म्हणून त्यांचा सर्वात अलीकडील प्रदर्शित झालेला चित्रपट मोहनलाल यांच्यासोबतचा 'थुदारुम' हा होता, तर त्यांचा अद्याप प्रदर्शित न झालेला 'पुलवर' हा चित्रपट अभिनेता म्हणून त्यांचा शेवटचा चित्रपट ठरणार आहे.
'इयक्कुनार इमायम' ही पदवी आणि राष्ट्रीय सन्मान
चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानामुळे त्यांना आदरपूर्वक इयक्कुनार इमायम (दिग्दर्शकांचा हिमालय) म्हणून संबोधले जात होते. त्यांच्या या अफाट कलेची दखल घेत भारत सरकारने वर्ष 2004 मध्ये त्यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेल्या 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित केले होते. याशिवाय त्यांच्या चित्रपटांना अनेक मानाचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही लाभले होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यानंतर उपचार घेऊन यंदाच्या एप्रिलमध्ये त्यांना डिस्चार्ज मिळाला होता, मात्र आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.