Indigo Flight Cuts: देशातील अग्रगण्य विमानसेवा कंपनी इंडिगोवर आता विमान वाहतूक नियामक डीजीसीएने कठोर पाऊल उचलले आहे. उड्डाण संचालनात होत असलेल्या वारंवार अडचणी आणि वेळापत्रक व्यवस्थापनातील त्रुटींचा दाखला देत डीजीसीएने इंडिगोची दैनंदिन उड्डाण क्षमता थेट 5 टक्क्यांनी घटवण्याचे आदेश जारी केले आहेत. सध्या कंपनी दिवसाला सुमारे 2,300 उड्डाणे करते, त्यामुळे सुमारे 115 फ्लाइट्स तत्काळ बंद केल्या जाणार आहेत.
सुधारित फ्लाइट शेड्यूल सादर करण्याच्या सूचना
डीजीसीएच्या निर्देशानुसार, इंडिगोने 10 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नव्याने तयार केलेले सुधारित फ्लाइट शेड्यूल सादर करणे बंधनकारक आहे. नियमांनुसार कंपनी आपले उड्डाण संचालन व्यवस्थित पार पाडण्यात अयशस्वी ठरत असल्याचा उल्लेखही डीजीसीएने निवेदनात केला आहे.
हेही वाचा – Goa Club Fire Incident: गोवा आग दुर्घटनेतील क्लब मालक थायलंडला फरार, फुकेतमध्ये असल्याची माहिती समोर
कपात आणखी वाढू शकते?
विमानवाहतूक मंत्रालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, देशाच्या कनेक्टिव्हिटीवर कमीतकमी परिणाम व्हावा यासाठी कोणती उड्डाणे कमी करावीत याचा सध्या बारकाईने विचार सुरू आहे. इंडिगोने जर पुढील काही दिवसांत विद्यमान वेळापत्रकानुसार उड्डाणे नियमित ठेवण्यात पुन्हा अडथळे निर्माण केले, तर 5 टक्क्यांची ही कपात पुढे आणखी वाढवली जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, हिवाळी वेळापत्रक लागू झाल्यापासून इंडिगोने दैनंदिन देशांतर्गत उड्डाणांमध्ये जवळपास 6 टक्के वाढ केली होती. उन्हाळ्यात साप्ताहिक 14,158 उड्डाणांची परवानगी असताना हिवाळ्यात हा आकडा 15,014 वर नेण्यात आला.
हेही वाचा – Donald Trump: अमेरिकेचा भारतावर नवा टॅरिफ प्रहार? ट्रम्प प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
"…IndiGo has not demonstrated the ability to operate its schedules efficiently. It is directed to reduce the schedule by 5% across sectors. IndiGo is required to submit a revised schedule by 5 pm on 10th December": Office of the Director General of Civil Aviation, Govt of… pic.twitter.com/AL6BEA2Jpb — ANI (@ANI) December 9, 2025
ही परिस्थिती कशी निर्माण झाली?
दरम्यान, 1 नोव्हेंबरपासून लागू झालेल्या नवीन फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (FDTL) नियमानुसार वैमानिकांची अतिरिक्त गरज निर्माण झाली. मात्र इंडिगोने या बदलासाठी आवश्यक ते नियोजन केले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यातच उड्डाणांमध्ये 6 टक्के वाढ ही स्थिती आणखी बिकट करणारी ठरली. पहिल्या आठवड्यात काही उड्डाणे रद्द होत होती, पण डिसेंबरमध्ये समस्या गंभीर बनली. केवळ आठ दिवसांत तब्बल 5,000 उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.