Surat Fire: गुजरातच्या सुरत शहरातील लिंबायत परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लिंबायतच्या 'मिठी खाडी' भागातील एका दुमजली घरात मंगळवारी सकाळी अचानक लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला. सिलिंडरमधून झालेल्या गॅस गळतीमुळे ही आग लागली असून, काही क्षणांतच या आगीने रौद्र रूप धारण केल्याने कोणालाही बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.
साड्यांच्या साठ्यामुळे आगीने घेतला वणव्याचे रूप
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 11 वाजताच्या सुमारास या घराच्या तळमजल्यावर स्वयंपाक सुरू असताना गॅस गळतीमुळे आग भडकली. हे कुटुंब घरातच साड्यांवर नक्षीकाम (भरतकाम) करण्याचा व्यवसाय करत असे. घरात मोठ्या प्रमाणावर साड्यांचा साठा, रसायने आणि तेलाची पिंपे असल्याने आगीने अवघ्या काही मिनिटांत संपूर्ण इमारतीला आपल्या विळख्यात घेतले. परिसरात धुराचे लोट पसरले होते. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून अडकलेल्यांना बाहेर काढले, मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
पुरुष कामावर गेले असतानाच काळाचा घाला
ज्यावेळी ही दुर्घटना घडली, त्यावेळी घरातील सर्व पुरुष सदस्य कामासाठी बाहेर गेले होते. घरात केवळ महिला आणि मुलेच उपस्थित होती. मृतांमध्ये 65 वर्षीय शहनवाज बेगम अन्सारी, 18 वर्षीय हुसैना बेगम, 28 वर्षीय शबिना अन्सारी, 19 वर्षीय खुशनुमा अन्सारी आणि केवळ 4 वर्षांचा चिमुरडा सुभान अन्सारी यांचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
रसायने आणि पॉलिस्टर ठरले घातक
सुरत हे साड्यांच्या उत्पादनाचे प्रमुख केंद्र असून, येथील घरगुती व्यवसायांमध्ये रसायनांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. या घरातही साड्यांच्या कामासाठी लागणारे ज्वलनशील तेल आणि रसायने साठवून ठेवलेली होती. गॅसच्या आगीने या रसायनांचा संपर्क येताच स्फोटक परिस्थिती निर्माण झाली. यामुळे घरात उपस्थित असलेल्या महिलांना स्वतःचा बचाव करण्याची कोणतीही संधी मिळाली नाही, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.