Natanz Nuclear Facility: मध्य-पूर्वेतील युद्ध अधिकच चिघळले असून शनिवारी पहाटे अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त फौजांनी इराणच्या 'नतान्झ' (Natanz) येथील मुख्य अणु-समृद्धीकरण केंद्राला लक्ष्य केले. या विनाशकारी हवाई हल्ल्यानंतर झालेल्या स्फोटाचा आवाज अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू आला. इराणच्या सरकारी माध्यमांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, हा हल्ला अत्यंत शक्तिशाली असल्याचे 'अल जझीरा'च्या अहवालात म्हटले आहे. या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण असले तरी सुदैवाने कोणतीही किरणोत्सर्गी गळती (Radioactive Leakage) झाली नसल्याचा दावा इराणने केला आहे.
रहिवाशांना धोका नाही; अणु-संस्थेचा दावा
इराणच्या 'तस्निम' वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, नतान्झ येथील 'शहीद अहमदी रोशन' या समृद्धीकरण सुविधेवर शनिवारी पहाटे हा हल्ला चढवण्यात आला. इराणच्या अणुऊर्जा संघटनेने स्पष्ट केले आहे की, हल्ल्यामुळे इमारतींचे नुकसान झाले असले तरी किरणोत्सर्गी पदार्थांचा प्रसार झालेला नाही. केंद्राच्या आसपास राहणाऱ्या रहिवाशांना सध्या कोणताही धोका नसून यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. अमेरिका आणि इस्रायलने सुरू केलेल्या गुन्हेगारी हल्ल्यांच्या मालिकेचा हा एक भाग असल्याचे इराणने म्हटले आहे.
इराणच्या अणु-क्षमतेवर घाला घालण्याचा प्रयत्न
इराणने कोणत्याही परिस्थितीत अणु-सक्षम राष्ट्र बनू नये, अशी भूमिका अमेरिका आणि इस्रायलने वारंवार मांडली आहे. नतान्झ हे इराणच्या युरेनियम समृद्धीकरणाचे सर्वात महत्त्वाचे केंद्र असल्याने यापूर्वीही अनेकदा ते लक्ष्य बनले आहे. युद्ध सुरू झाल्याच्या पहिल्या आठवड्यातही उपग्रह प्रतिमांतून या केंद्रातील इमारतींचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले होते. तेहरानपासून सुमारे 220 किलोमीटर (135 मैल) अंतरावर असलेल्या या केंद्रावर पुन्हा एकदा हल्ला करून इराणच्या अणु-कार्यक्रमाला खीळ घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.
हेही वाचा – Crude Oil: अमेरिकेने इराणवरील निर्बंध हटवले; भारताचा स्वस्त दरात कच्चे तेल मिळण्याचा मार्ग मोकळा
आंतरराष्ट्रीय करारांचे उल्लंघन; संघर्षाची तीव्रता वाढली
इराणने या हल्ल्याचा तीव्र निषेध करत, हा 'अणु-प्रसारबंदी करार' (NPT) आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा नियमांचे सरळ उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. जून 2025 मधील संघर्षानंतर आता या युद्धाला तीन आठवडे उलटले असून तणाव कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. एकीकडे इस्रायलवर इराणकडून क्षेपणास्त्रे डागली जात आहेत, तर दुसरीकडे सौदी अरेबियाने आपल्या तेल क्षेत्रावर आलेले 20 ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे. या सर्व घडामोडींमुळे जागतिक राजकारण आणि ऊर्जा क्षेत्रावर मोठे सावट निर्माण झाले आहे.