Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळावर आता ‘डे-नाईट’ उड्डाणे; आजपासून 24 तास सेवा सुरू

गेल्या महिनाभरापासून केवळ 12 तासांसाठी मर्यादित असलेले हे विमानतळ आज, 1 फेब्रुवारीपासून 24 तास कार्यान्वित झाले आहे.

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळावर आता ‘डे-नाईट’ उड्डाणे; आजपासून 24 तास सेवा सुरू

Navi Mumbai Airport: प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (NMIA) आजपासून एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. गेल्या महिनाभरापासून केवळ 12 तासांसाठी मर्यादित असलेले हे विमानतळ आज, 1 फेब्रुवारीपासून 24 तास कार्यान्वित झाले आहे. आता सकाळी 8 ते रात्री 8 या मर्यादेतून बाहेर पडत हे विमानतळ रात्रभर प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज असेल.

रात्रीच्या प्रवासाचे नियोजन कसे असेल?
विमानतळ 24 तास सुरू झाले असले तरी, वेळापत्रकात टप्प्याटप्प्याने बदल केले जात आहेत. सध्या पहिले विमान सकाळी 7:10 वाजता झेपावेल, तर शेवटचे उड्डाण रात्री 9:50 वाजता होईल. तथापी, मार्चअखेरीस जेव्हा एअरलाईन्सचे 'समर शेड्युल' लागू होईल, तेव्हा मध्यरात्रीच्या उड्डाणांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढेल. सध्या तासाला 10 विमानांची ये-जा होत असून, एप्रिलपर्यंत ही संख्या ताशी 20 विमानांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे.

हेही वाचा – Badlapur News: सकाळच्या धावपळीत बद्लापूर स्टेशनवर धावत्या ट्रेनमध्ये चढताना तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारताची मोठी झेप
युरोप आणि अमेरिकेतील अनेक मोठी विमानतळे ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी रात्री 11 ते पहाटे 5 या काळात बंद ठेवली जातात. मात्र, नवी मुंबई विमानतळ आता मुंबईप्रमाणेच 24 तास उघडे राहणार आहे. यामुळे विमानांना विलंब झाल्यास किंवा कनेक्टिव्हिटीसाठी प्रवाशांना टर्मिनलमध्ये सुरक्षितपणे रात्र काढणे सोपे जाणार आहे.

प्रवाशांचा उदंड प्रतिसाद आणि नवा विक्रम
दरम्यान, 25 डिसेंबर रोजी उद्घाटन झाल्यापासून अवघ्या 19 दिवसांत या विमानतळाने 1 लाख प्रवाशांचा टप्पा ओलांडून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. वाढत्या गर्दीला सामावून घेण्यासाठी 24 तास सेवा सुरू करण्याचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे.

कनेक्टिव्हिटीला 'मेट्रो'चा बूस्ट
प्रवाशांसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे, मुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही विमानतळांना जोडणाऱ्या मेट्रो लाईन 8 च्या 35 किमी विस्ताराला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) आणि नवी मुंबई विमानतळ यांमधील प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number