Harbor Line Expansion: मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट; गोरेगाव ते बोरीवली हार्बर विस्ताराला वेग; पश्चिम रेल्वेकडून पुलांच्या कामासाठी निविदा जाहीर

हार्बर रेल्वे मार्गाचा गोरेगाव ते बोरीवली विस्तार करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अखेर गती मिळाली असून पश्चिम रेल्वेने या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.

Harbor Line Expansion: मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट; गोरेगाव ते बोरीवली हार्बर विस्ताराला वेग; पश्चिम रेल्वेकडून पुलांच्या कामासाठी निविदा जाहीर

Harbor Line Expansion: मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. हार्बर रेल्वे मार्गाचा गोरेगाव ते बोरीवली विस्तार करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अखेर गती मिळाली असून पश्चिम रेल्वेने या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. मातीकाम आणि पुलांच्या बांधकामासाठी निविदा आमंत्रित करण्यात आल्या असून, मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (MUTP)-3A अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे पश्चिम उपनगरांतील लाखो प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. उपलब्ध जागेवर लवकरच प्रत्यक्ष बांधकाम सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बोरीवली, कांदिवली आणि मालाडला मिळणार थेट लाभ

सध्या हार्बर मार्गावरील लोकल सेवा गोरेगाव स्थानकापर्यंतच मर्यादित आहे. त्यामुळे मालाड, कांदिवली आणि बोरीवली परिसरातील प्रवाशांना हार्बर मार्गाचा थेट लाभ मिळत नाही. मात्र, विस्तार प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या भागांतील नागरिकांना सीएसएमटी, वडाळा, कुर्ला, पनवेल आणि नवी मुंबईपर्यंत थेट रेल्वे जोडणी उपलब्ध होणार आहे. यामुळे पश्चिम आणि हार्बर मार्गांदरम्यानचा प्रवास अधिक सोयीस्कर होईल.

898.29 कोटींचा प्रकल्प; 18 पुलांची उभारणी

या प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च 898.29 कोटी रुपये इतका आहे. त्यापैकी नागरी कामांसाठी 727.64 कोटी, विद्युत कामांसाठी 88.33 कोटी आणि सिग्नल व दूरसंचार यंत्रणेसाठी 82.31 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. प्रकल्पांतर्गत 2 मोठे आणि 16 लहान पूल उभारण्यात येणार आहेत. यासाठी तयार करण्यात आलेल्या 4 अभियांत्रिकी आराखड्यांपैकी बहुतांश आराखड्यांना मंजुरी मिळाली असून उर्वरित प्रस्ताव अंतिम मंजुरीच्या टप्प्यात आहेत.

भूसंपादन आणि पुनर्वसन प्रक्रिया अंतिम टप्प्यात

या रेल्वे मार्गासाठी एकूण 3,687.7 चौरस मीटर जागेची आवश्यकता आहे. त्यापैकी 3,389 चौरस मीटर जमीन खाजगी मालकीची असून 298.7 चौरस मीटर जागा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत आहे. मार्गातील सुमारे 3,650 मीटर भाग भूसंपादन, पुनर्वसन, अतिक्रमण आणि विविध सार्वजनिक सुविधांमुळे प्रभावित झाला होता. मात्र, आता 3,430 मीटर म्हणजेच 54.1 टक्के मार्ग बांधकामासाठी उपलब्ध झाला आहे. खाजगी जमिनीचे संपादन अंतिम टप्प्यात असून महानगरपालिकेच्या जमिनीचे मूल्यांकन सुरू आहे.

520 बाधित कुटुंबांपैकी 178 कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण

प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या 520 कुटुंबांची ओळख पटवण्यात आली आहे. यापैकी 178 कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण झाले असून उर्वरित पात्र कुटुंबांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय स्थानक आणि सेवा इमारतींची उभारणी 56.84 कोटींच्या खर्चातून सुरू असून पादचारी पूल, उन्नत डेक आणि स्कायवॉकची कामे 69.98 कोटींच्या खर्चाने प्रगतीपथावर आहेत.

हेही वाचा – Mumbai Local:आता जास्त वादळीवारा, पाऊस झाला तरी अडकण्याची भीती नाही, मुंबईकरांच्या सुस्साट प्रवासासाठी प्रशासनानं केलं मोठं काम

मुंबईच्या रेल्वे जाळ्यात महत्त्वाची भर

हार्बर मार्गाचा बोरीवलीपर्यंत विस्तार हा मुंबईच्या उपनगरीय रेल्वे व्यवस्थेसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या प्रकल्पामुळे पश्चिम उपनगरांतील प्रवाशांना पर्यायी रेल्वे मार्ग उपलब्ध होईल, गर्दी कमी होण्यास मदत होईल आणि मुंबई तसेच नवी मुंबईदरम्यानचा प्रवास अधिक वेगवान व सोयीस्कर होणार आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number