JW Marriott Hotel : मुंबईत पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलावर आढळलं झुरळ; डॉक्टर तज्ञांची FDA कडे तक्रार, केली ‘ही’ मागणी

या घटनेनंतर डॉ. सेठ यांनी हॉटेलच्या बेफिकीर कारभारावर उपरोधिक आणि कडक शब्दांत टीका करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.<br/>

JW Marriott Hotel : मुंबईत पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलावर आढळलं झुरळ; डॉक्टर तज्ञांची FDA कडे तक्रार, केली ‘ही’ मागणी

JW Marriott Cockroach: मुंबईतील सहार येथील अत्यंत प्रतिष्ठित आणि लक्झरी पंचतारांकित हॉटेल मानल्या जाणाऱ्या जेडब्ल्यू मॅरियटमधील ‘रोमानो’ रेस्टॉरंटमध्ये एक संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देशातील प्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ आणि फोर्टिस हेल्थकेअरचे अध्यक्ष डॉ. अशोक सेठ शनिवारी संध्याकाळी काही परदेशी प्रतिनिधींसोबत जेवत असताना, त्यांच्या टेबलावर अन्नाच्या डिशेसच्या आसपास एक लहान झुरळ फिरताना आढळले. या घटनेनंतर डॉ. सेठ यांनी हॉटेलच्या बेफिकीर कारभारावर उपरोधिक आणि कडक शब्दांत टीका करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

“आमची भूकच मरून गेली”: डॉ. अशोक सेठ यांची उपरोधिक पोस्ट

या घटनेबाबत रविवारी संध्याकाळी ‘एक्स’ (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती देताना डॉ. सेठ यांनी अत्यंत मार्मिक पोस्ट लिहिली. “बघा, जेवायला कोण अनपेक्षितपणे आले होते ते. ‘रोची’ (Roachie) म्हणजेच एक लहान झुरळ आमच्या टेबलावर आले होते आणि त्याला आमच्यासोबत जेवण करायचे होते! आम्ही खूप समजावून सांगूनही ते तिथून जायला तयार नव्हते, कदाचित त्याला पास्ता नको तर पिझ्झा हवा असावा,” अशा उपरोधिक शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. हे अस्वच्छ दृश्य पाहिल्यानंतर आपली भूकच मरून गेली आणि आम्ही जेवण न करताच तिथून निघून आलो, असेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा – Dahisar Ganesh Mandal : मध्यरात्री गणपती मंडपातील बाप्पाच्या मूर्तीवर दगडफेक; सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपींची ओळख पटली, एकाला अटक

परदेशी प्रतिनिधींसमोर देशाची बदनामी; स्वच्छतेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना डॉ. अशोक सेठ यांनी या संपूर्ण प्रकारावर प्रचंड नाराजी व्यक्त केली. “आम्ही काही परदेशी पाहुण्यांसोबत तिथे जेवायला गेलो होतो. अशा नामांकित पंचतारांकित हॉटेलमध्ये घडलेला हा प्रकार देशासाठी अत्यंत लज्जास्पद आहे. टेबलावर झुरळ दिसले आहे, तर स्वयंपाकघरात आणखी किती असतील? हे हॉटेल जेवणासाठी अवाढव्य पैसे आकारते, त्यामुळे त्यांनी दर्जेदार आणि सुरक्षित सेवा देणे अपेक्षित आहे,” अशा शब्दांत त्यांनी जेडब्ल्यू मॅरियटच्या बेफिकीर व्यवस्थापनावर जोरदार प्रहार केला.

अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडे कारवाईची मागणी

या घटनेनंतर डॉ. सेठ यांनी महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंडे, एफएसएसएआय (FSSAI) आणि जेडब्ल्यू मॅरियट यांना आपल्या पोस्टमध्ये थेट टॅग केले आहे. मे 2026 मध्ये पदभार स्वीकारल्यापासून तुकाराम मुंडे यांनी राज्यभरात अस्वच्छ आणि निष्काळजी रेस्टॉरंट्सवर कठोर धाडी टाकून त्यांचे परवाने निलंबित केले आहेत. मुंडे यांनी खाण्याच्या ठिकाणी झुरळं, उंदरांचा प्रादुर्भाव आणि मुदत संपलेले अन्न घटक वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई केली आहे. “सुदैवाने आम्ही श्री. मुंडे यांच्या कार्यक्षेत्रात आहोत आणि ते या गंभीर प्रकरणाची नक्कीच कठोर दखल घेतील,” अशी आशा डॉ. सेठ यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या संपूर्ण वादावर जेडब्ल्यू मॅरियट हॉटेल प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number