Smart Meter Electricity Bill Hike : राज्यभरात सध्या महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवले जात असतानाच, दुसरीकडे वीजबिलात अचानक मोठी वाढ झाल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. या वाढलेल्या बिलांमुळे सर्वसामान्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, स्मार्ट मीटरमुळेच हा सगळा घोळ झाल्याचा सूर उमटत आहे. मात्र, या सर्व चर्चांवर पूर्णविराम लावत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात यामागील खरे कारण स्पष्ट केले आहे. वीजबिल वाढण्यामागे स्मार्ट मीटरमध्ये तांत्रिकदृष्ट्या कोणताही दोष नसून, यंदा उन्हाळ्यात वाढलेला वीज वापर आणि महाराष्ट्रातील 'टेलिस्कोपिक' (Telescopic) वीज दरवाढ पद्धत याला कारणीभूत असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.
1 BHK आणि 2 BHK घरांचे मुख्यमंत्र्यांनी मांडलेले गणित
यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे आणि उष्णतेच्या लाटेमुळे घराघरांमध्ये विजेचा वापर प्रचंड वाढला होता, हे समजावून सांगण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 1 बीएचके आणि 2 बीएचके घरांचे थेट गणितच मांडले. साधारण 1 बीएचके (1 BHK) घरात दीड टनाचा एसी, एक फ्रीज आणि पंखे असतात, ज्यांचे नेहमीचे बिल साधारण 270 युनिट्स पर्यंत येत होते. मात्र, यंदाच्या प्रचंड उकाड्यामुळे याच घरात तब्बल 415 युनिट्स वीज वापरली गेल्याने मासिक बिल थेट 2500 रुपयांवरून 5,000 रुपयांवर गेले. तसेच, 2 बीएचके (2 BHK) घरात सरासरी वीज वापर 425 युनिट्स वरून वाढून थेट 655 युनिट्स वर पोहोचल्यामुळे, नेहमीचे 4,500 रुपयांचे बिल थेट 8,000 रुपयांवर गेले.
हेही वाचा – Mumbai BEST bus Shevpuri: बस थांबवून शेवपुरी घेणं पडलं महागात; BEST चालकावर कारवाईचा बडगा
वीज वापर थोडा वाढला तरी बिल दुप्पट का होते?
वीज वापर काही युनिट्सने वाढला तरी बिलाची रक्कम थेट दुप्पट का होते, यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील 'टेलिस्कोपिक' वीज दर रचना समजून सांगितली. आपल्या राज्यात विजेचा वापर जसा वाढतो, तसा प्रति युनिटचा दरही टप्प्याटप्प्याने महाग होत जातो. त्यानुसार, 300 युनिटपर्यंत सरकार सर्वसामान्यांना स्वस्त दरात वीज उपलब्ध करून देते; मात्र वीज वापर 300 युनिटच्या वर जाताच, प्रति युनिट दरात थेट 5 रुपयांची वाढ होते. तसेच वीज वापर 500 युनिटच्या वर गेल्यास दरात आणखी 2 रुपयांची वाढ होते. यामुळेच दोन्ही उदाहरणांमध्ये मर्यादेपेक्षा जास्त वापर झाल्याने बिलाची रक्कम थेट दुप्पट झाली.
स्मार्ट मीटर नसलेल्या भागांतही बिलांमध्ये वाढ
वाढलेल्या बिलांचा आणि नवीन स्मार्ट मीटरचा कोणताही थेट संबंध नाही, हे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले. ज्या भागांमध्ये अजून महावितरणने स्मार्ट मीटर बसवलेले देखील नाहीत, तिथेही नागरिकांना अशीच वाढीव बिलं आली असल्याचे त्यांनी सभागृहाला सांगितले. यंदाचा कडक उन्हाळा आणि हीट वेव्हमुळे (Heat Wave) एसी, कुलर आणि पंख्यांचा वापर जास्त वेळ करावा लागल्याने ज्यांच्याकडे जुने मीटर आहेत त्यांचीही वीज बिलं वाढल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता विजेचा वापर आणि दररचना समजून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.