भाजपने बावनकुळे यांच्यासारख्या ओबीसी नेत्याला अध्यक्ष केलं, काँग्रेसने सुद्धा केलं, आमच्या पक्षात सुद्धा ओबीसी नेते आहेत त्यांना सुद्धा संधी दिली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपल्या पक्षाकडे केली आहे. या पदासाठी सुनील तटकरे, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड आहेत. मला दिलं तर मी सुद्धा काम करेल, असे छगन भुजबळ आज मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांच्या या मागणीमुळे अजित पवारांची डोकेदुखी मात्र वाढल्याचे चित्र आहे.
मला विरोधी पक्षनेते पद नको, मला पक्ष संघटनेत काम करण्याची संधी द्या अशी ठोक भूमिका काल विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या जाहीर कार्यक्रमात मांडली. तसेच त्यांनी बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर देखील रोख धरल्याने अजित पवारांची प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा लपून राहिली नाही. मात्र असे असताना आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत आज एक मोठी मागणी केली त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे.
पत्रकार परिषदेत छगन भुजबळ म्हणाले,”आमचा पक्ष लोकशाहीने चालणारा पक्ष आहे. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. अजित पवार यांना वेगळ पद किंवा काम करायचं आहे पण ते पक्षातच काम करणार म्हणतात. अजित पवारांच्या इच्छेवर छगन भुजबळांनी ही प्रतिक्रिया दिली. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, “माझं मत सुद्धा मी मांडतो. मला फक्त चार महिने अध्यक्षपद मिळालं. भाजपने बावनकुळे यांच्यासारख्या ओबीसी नेत्याला अध्यक्ष केलं. काँग्रेसने सुद्धा दिलं. आमच्या पक्षातसुद्धा ओबीसी नेते आहेत त्यांना सुद्धा संधी दिली पाहिजे. सुनील तटकरे, धनंजय मुंडे , जितेंद्र आव्हाड आहेत, मला दिलं तर मी सुद्धा काम करेन. छोट्या समाजाला अध्यक्षपद दिलं पाहिजे असं मला वाटतं,” असे छगन भुजबळ म्हणाले.