AI Palm Reading Trend : पूर्वी एखाद्या झाडाखाली एखादा ज्योतिषी बसलेला असायचा. त्याच्याजवळ अनेकदा एक पोपट असायचा. या पोपटाच्या मदतीने माणसांचे भविष्य सांगितले जायचे. काही लोकांना यावर विश्वास बसायचा तर काही लोक फक्त गंमत म्हणून याकडे पाहत असत. अशाच पद्धतीने आता या पोपटाची जागा AI ने किंवा ChatGPT ने घेतली आहे आणि AI आता लोकांना भविष्य सांगू लागले आहे. सध्या सोशल मीडियावर 'चॅटजीपीटी'च्या एका अनोख्या वापराची प्रचंड चर्चा रंगली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आता केवळ प्रश्नांची उत्तरे देण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती एखाद्या अनुभवी ज्योतिषाप्रमाणे तुमच्या हातावरील रेषांचे वाचनही करू लागली आहे.
युजर्स आपल्या हाताचे फोटो चॅटजीपीटीवर अपलोड करत असून, हे टूल हातातील जीवनरेखा, हृदयरेखा आणि भविष्य सांगणाऱ्या रेषांचे विश्लेषण करून सविस्तर माहिती देत आहे. विशेष म्हणजे, हे AI टूल केवळ मजकूरच देत नाही, तर तुमच्या नशिबाच्या रेषांचा अर्थ स्पष्ट करणारी आकर्षक ग्राफिक्स देखील तयार करत असल्याने हा ट्रेंड वेगाने व्हायरल होत आहे.
तुम्हीही गंमत म्हणून करून पाहू शकता.. असे करा हाताचे स्कॅनिंग
– तुमचा डॉमिनंट हात (ज्या हाताने तुम्ही जास्त काम करता) निवडा.
– हाताचा फोटो चांगल्या प्रकाशात आणि स्पष्ट दिसेल असा काढा.
– फोटो काढताना बोटे आरामात ठेवा, जास्त ताणू नका.
– हातावर कोणतीही सावली पडणार नाहीत याची काळजी घ्या.
– हा फोटो ChatGPT मध्ये अपलोड करा आणि विश्लेषण विचारून घ्या.
खालील प्रॉम्प्ट वापरा
"Act as an experienced palm reader, blending traditional Indian Vedic Palmistry with modern psychological analysis. I am uploading a clear image of my dominant hand.
Instructions:
Identify & Signify: Confirm which hand it is and its significance.
Major & Minor Lines: Analyze the Heart, Head, Life, and Fate lines for depth, length, and intersections.
Mounts & Markings: Evaluate the mounts (Jupiter, Venus, etc.) and look for rare signs like a Fish, Trident, or Island.
Life Areas: Provide specific insights on Career growth, Relationships, and Vitality.
Visual Summary: Create a clear, scannable summary or infographic-style breakdown of the findings.
Be observational and avoid generic fluff. Explain the 'why' behind each point."
हे भाकीत खरे वाटते.. पण खरे असते का?
अनेकांना चॅटजीपीटीने सांगितलेले भविष्य अचूक असल्याचे जाणवत आहे, मात्र यामागे एक वैज्ञानिक आणि मानसशास्त्रीय गुपित दडलेले आहे. एआय (AI) प्रामुख्याने पुस्तकी ज्ञानाचा आणि पारंपारिक हस्तरेषाशास्त्राच्या माहितीचा आधार घेते. 'तुम्ही खूप विचार करता' किंवा 'लोकांवर विश्वास ठेवायला तुम्ही थोडा वेळ घेता' यांसारखी वाक्ये कोणालाही स्वतःसाठी लागू होतात असे वाटते. चॅटजीपीटी तुमच्या हाताच्या फोटोंमधील विशिष्ट 'पॅटर्न' ओळखते आणि त्याला मानसशास्त्राची जोड देऊन इतक्या रंजक पद्धतीने मांडते की, वाचणाऱ्याला ते पूर्णपणे आपल्याबद्दलच आहे असे वाटू लागते. हे केवळ तंत्रज्ञानाचे विश्लेषण नसून प्रभावी 'स्टोरीटेलिंग'चा एक भाग आहे.
युजर्ससाठी नवा अनुभव
लोक आता 'AI प्रॉम्प्ट' कॉपी करून आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, जसे की "तुमचे लग्न कधी ठरणार?" किंवा "करिअरमध्ये कधी प्रगती होणार?". जरी हे तंत्रज्ञान गमतीशीर आणि माहितीपूर्ण वाटत असले, तरी अनेक तज्ज्ञ याला केवळ मनोरंजनाचा एक भाग मानण्याचा सल्ला देतात. तंत्रज्ञानाच्या जगात एआय आता वैयक्तिक विश्लेषणाच्या पलीकडे जाऊन मानवी भावना आणि नशिबाच्या संकल्पनेला स्पर्श करू लागल्याने, भविष्यात ज्योतिष आणि तंत्रज्ञानाचे नाते कसे असेल, याबाबत आतापासूनच तर्कवितर्क लढवले जात आहेत.