Central Railway Recruitment: मध्य रेल्वेने (Central Railway) 16 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध केलेली ‘GDCE 01/2026’ ही भरतीची अधिसूचना अखेर रद्द केली आहे. रेल्वे लवकरच या संदर्भात नवीन अधिसूचना प्रसिद्ध करणार असल्याचे समजते. मात्र, या जाहिरातीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तीव्र विरोध दर्शवला असून, आगामी नवीन अधिसूचनेत परीक्षेसाठी ‘मराठी’ भाषेचा पर्याय अनिवार्य करण्याची मागणी लावून धरली आहे.
CBT परीक्षेत मराठी भाषेला डावलल्याचा मनसेचा आरोप
मनसेने आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनावर निशाणा साधला आहे. रद्द करण्यात आलेल्या अधिसूचनेत संगणक आधारित परीक्षेसाठी (CBT) मराठी भाषेचा पर्याय डावलून केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेची सक्ती करण्यात आली होती. या अन्यायाविरोधात मनसे नेते अमित ठाकरे यांनी आधीच आक्रमक भूमिका घेतली असून रेल्वे प्रशासनाला जाब विचारला आहे. जाहिरात कोणत्याही तांत्रिक कारणास्तव रद्द झाली असली, तरी मराठी भाषेच्या समावेशाचा आमचा मूळ आक्षेप कायम असल्याचे मनसेने स्पष्ट केले आहे.
रेल्वे मंत्र्यांच्या आश्वासनाची आठवण
अमित ठाकरे यांनी नमूद केल्याप्रमाणे, मागील अनेक वर्षांपासून रेल्वेच्या परीक्षा मराठी भाषेतून पार पडत आहेत. विशेष म्हणजे, ऑगस्ट 2025 मध्ये खुद्द रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत रेल्वे परीक्षांमध्ये प्रादेशिक भाषांचा समावेश असेल, असे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पायमल्ली रेल्वे प्रशासन करत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. त्यामुळे, आता येणाऱ्या नवीन अधिसूचनेत मराठी भाषेचा पर्याय असणे कायदेशीर आणि नैतिकदृष्ट्या अनिवार्य असल्याचे पक्षाने म्हटले आहे.
मराठीची गळचेपी सहन करणार नाही; मनसेचा इशारा
महाराष्ट्रातील उमेदवारांच्या हक्काच्या मराठी भाषेची गळचेपी कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही, असा इशारा मनसेने दिला आहे. “नवीन जाहिरातीत जर मराठी भाषेचा समावेश नसेल, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप्प बसणार नाही,” असे पोस्टमध्ये ठामपणे नमूद करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने नोंद घ्यावी आणि मराठी भाषेचा जाणीवपूर्वक अपमान टाळावा, असे आवाहनही पक्षाने केले आहे.