NEET Re Exam Security : वैद्यकीय शिक्षणासाठी होणाऱ्या ‘नीट’ परीक्षेभोवती निर्माण झालेल्या पेपरफुटी आणि गैरव्यवहारांच्या वादानंतर केंद्र सरकारने यंदा अभूतपूर्व पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी 21 जून रोजी होणारी फेरपरीक्षा कोणत्याही प्रकारच्या गोंधळाशिवाय आणि पूर्ण सुरक्षिततेत पार पाडण्यासाठी आता थेट संरक्षण यंत्रणांची मदत घेतली जाणार आहे. परीक्षा प्रश्नपत्रिका देशभरातील केंद्रांवर पोहोचवण्यासाठी भारतीय वायूदलाच्या विमानांचा वापर केला जाणार असून, संपूर्ण प्रक्रियेवर लष्करी पातळीवर देखरेख ठेवली जाणार आहे.
दिल्लीत उच्चस्तरीय बैठकीत मोठे निर्णय
नीट परीक्षेच्या सुरक्षा आराखड्यावर चर्चा करण्यासाठी राजधानी दिल्लीत केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, एनटीए आणि सीबीएसईचे वरिष्ठ अधिकारी तसेच पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. बैठकीत परीक्षा केंद्रांवरील सुरक्षा, प्रश्नपत्रिकांची वाहतूक, तांत्रिक देखरेख आणि संवेदनशील भागांमधील अतिरिक्त बंदोबस्त या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
पेपरफुटी रोखण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था
गेल्या काही महिन्यांत नीट परीक्षेबाबत उघड झालेल्या गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता. त्यानंतर सरकारने परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे ‘फुलप्रूफ’ करण्याचा निर्धार केला आहे. प्रश्नपत्रिका वाहतुकीदरम्यान कोणतीही गळती होऊ नये यासाठी विशेष विमानांचा वापर केला जाणार आहे. तसेच संवेदनशील परीक्षा केंद्रांवर अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात येणार असून, डिजिटल मॉनिटरिंग आणि तांत्रिक तपासणीची व्यवस्थाही अधिक मजबूत केली जाणार आहे.
विद्यार्थ्यांचा विश्वास परत मिळवण्याचे आव्हान
नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातून केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेवर जोरदार टीका झाली होती. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित या गंभीर मुद्द्यावर आता थेट गृह आणि संरक्षण यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. लष्कर आणि वायूदलाच्या सहभागामुळे परीक्षा केंद्रांपासून प्रश्नपत्रिकांच्या वितरणापर्यंत प्रत्येक टप्प्यावर कडेकोट सुरक्षा असणार आहे. 21 जूनची फेरपरीक्षा कोणत्याही वादाशिवाय पार पडावी, यासाठी प्रशासन युद्धपातळीवर तयारी करत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा – New LPG Rules: होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर गॅस वितरणात मोठे बदल; 1 जूनपासून लागू होणार 'हा' नवीन नियम
सीबीआयकडून आर्थिक व्यवहारांचाही तपास
दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी शिवराज मोटेगांवकर आणि त्याच्या कुटुंबीयांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशीही वेगाने सुरू आहे. सीबीआयने संबंधित बँक खाती आणि लॉकरांची तपासणी सुरू केली असून, मोठ्या आर्थिक देवाणघेवाणीचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. या तपासादरम्यान मोठी रोकड, मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पेपरफुटी रॅकेटमागील आर्थिक साखळी उघड करण्यासाठी तपास यंत्रणा विविध राज्यांमध्ये समन्वय साधून कारवाई करत आहेत.