Contaminated Mangoes: उन्हाळ्यात आंब्याचा रस पिणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुजरातमधील मेहसाणा येथे अन्न आणि औषध विभागाने एका ज्यूस सेंटरच्या गोदामावर छापा टाकून मोठ्या प्रमाणात सडलेले, कुजलेले आणि किड लागलेले आंबे जप्त केले आहेत. या कारवाईत तब्बल 2,025 किलो खराब झालेले आंबे आढळून आले असून ते जागेवरच नष्ट करण्यात आले. या घटनेमुळे खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
गुप्त माहितीच्या आधारे कारवाई
मेहसाणा जिल्ह्यातील नुगेर गावाजवळ असलेल्या महादेव इंडस्ट्रियल पार्कमध्ये ‘पाटीदार रस केंद्र’ या आंबा घाऊक विक्रेत्याचे गोदाम आहे. येथे बाजारासाठी मोठ्या प्रमाणात आंब्याचा पल्प तयार केला जात असल्याची माहिती अन्न विभागाला मिळाली होती. त्यानंतर अन्न अधिकारी व्ही. जे. चौधरी आणि त्यांच्या पथकाने अचानक छापा टाकला. तपासादरम्यान गोदामात साठवून ठेवलेल्या अनेक आंब्यांमध्ये कुज, सडलेपणा आणि किडींचा प्रादुर्भाव आढळून आला.
आंब्यांसह पल्पही नष्ट
अधिकाऱ्यांनी कारवाईदरम्यान सुमारे 2,025 किलो खराब आंबे जप्त केले. याशिवाय तयार करून ठेवलेला 230 ग्रॅम आंब्याचा पल्पही निकृष्ट दर्जाचा असल्याचे आढळल्याने तोही नष्ट करण्यात आला. अन्न सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून संबंधित प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
बाहेरील ज्यूस पिताना सावध राहण्याचा इशारा
‘नॅशनल असोसिएशन ऑफ स्ट्रीट व्हेंडर्स ऑफ इंडिया’च्या माहितीनुसार, देशभरात सुमारे 1 कोटी विक्रेते विविध खाद्यपदार्थ आणि पेये विकतात. त्यामुळे बाहेर मिळणाऱ्या ज्यूस आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत ग्राहकांनी अधिक जागरूक राहण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. विशेषतः उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर विकल्या जाणाऱ्या फळांच्या रसामध्ये भेसळ किंवा निकृष्ट दर्जाचे फळ वापरले जाण्याचा धोका असतो.
#Gujarat #Mehsana
The Gujarat Food Safety Department enforcement teams discovered and seized massive stock of mangoes intended for juice extraction.
Mangoes used for juice extraction were found heavily rotten, worm-eaten & visibly infested with fungus and insects.#FSSAIAction pic.twitter.com/bjiy7VuLNw — FSSAI (@fssaiindia) June 3, 2026
घरी बनवा सुरक्षित आंब्याचा रस
तज्ज्ञांच्या मते, बाजारातील भेसळयुक्त ज्यूस टाळण्यासाठी घरी तयार केलेला ताजा आंब्याचा रस हा उत्तम पर्याय आहे. पिकलेले आंबे, थंड दूध किंवा पाणी, साखर आणि बर्फ वापरून काही मिनिटांत स्वादिष्ट आंब्याचा रस तयार करता येतो. घरी बनवलेला ज्यूस केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठी अधिक सुरक्षित आणि पोषकही ठरतो.
आरोग्याची काळजी घेणे गरजेचे
मेहसाण्यातील या कारवाईने अन्न सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. ग्राहकांनी फळांचे रस आणि खाद्यपदार्थ खरेदी करताना स्वच्छता, गुणवत्ता आणि विश्वासार्हतेची खात्री करणे आवश्यक असल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले आहे. विशेषतः उन्हाळ्यात आरोग्य बिघडवणारे पदार्थ टाळून ताजे आणि सुरक्षित अन्नपदार्थांना प्राधान्य देणे गरजेचे आहे.