Cancer Drug Price Hike: कर्करोगाशी (कॅन्सर) लढा देणाऱ्या रुग्णांना औषध दरवाढीचा मोठा फटका बसला आहे. केंद्र सरकारच्या 'नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग ऑथॉरिटी'ने (NPPA) काही अत्यंत महत्त्वाच्या कॅन्सररोधी औषधांच्या किमती वाढवण्यास हिरवा कंदील दिला आहे. या निर्णयामुळे कॅन्सरच्या उपचारांचा खर्च आता अधिक वाढणार आहे.
नेमका का घेतला हा निर्णय?
औषध दरवाढीमागचे मुख्य कारण स्पष्ट करताना 'NPPA' ने सांगितले की, ही औषधे तयार करण्यासाठी लागणाऱ्या 'प्लॅटिनम' या कच्च्या मालाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रचंड वाढल्या आहेत. यामुळे या कच्च्या मालाचा पुरवठा विस्कळीत होऊन औषधांचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची भीती होती. औषध निर्मिती कंपन्यांनीही वाढत्या खर्चामुळे उत्पादन थांबवण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे बाजारात औषधांची टंचाई निर्माण होऊ नये आणि रुग्णांना ती वेळेत उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने औषध मूल्य नियंत्रण कायदा (DPCO) च्या 'पॅरा 19' मधील विशेष अधिकारांचा वापर करून सरकारने हा निर्णय घेतला आहे.
कोणत्या औषधांचे दर किती वाढले?
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नव्या दरवाढीनुसार, कॅन्सरच्या उपचारात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या दोन इंजेक्शनच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. यामध्ये कार्बोप्लेटिन (Carboplatin) या इंजेक्शनची जुनी किंमत 60.49 प्रति मिली (ml) वरून वाढवून आता 90.74 प्रति मिली करण्यात आली आहे. तर दुसरीकडे, सिस्प्लाटिन (Cisplatin) या इंजेक्शनच्या दरातही वाढ झाली असून, त्याची जुनी किंमत 7.26 प्रति मिली वरून आता 10.89 प्रति मिली इतकी झाली आहे.
कोणत्या कर्करोगाच्या उपचारात होतो वापर?
या दोन्ही औषधांचा प्रामुख्याने ओवेरियन (अंडाशय), यकृत (लिव्हर), ब्लॅडर (मूत्राशय) आणि टेस्टिक्युलर कॅन्सरच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
NPPA चे स्पष्टीकरण
हा निर्णय रुग्णांचे हित आणि बाजारात औषधांचा पुरवठा अखंडित सुरू राहावा या दुहेरी उद्देशाने घेण्यात आला आहे. किमती वाढवल्या नसत्या तर कच्च्या मालाच्या टंचाईमुळे ही औषधे बाजारातून गायब झाली असती, ज्यामुळे रुग्णांचे मोठे नुकसान झाले असते, असे NPPA ने स्पष्ट केलं आहे.