MPSC New Rules: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा आणण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यापुढे उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची आणि कागदपत्रांची पडताळणी केंद्र सरकारच्या 'डिजिलॉकर' (DigiLocker) प्रणालीद्वारे केली जाणार आहे. सध्या ही पद्धत ऐच्छिक असली, तरी भविष्यात ती अनिवार्य केली जाणार असल्याचे संकेत आयोगाने दिले आहेत.
उमेदवारांनी नक्की काय करायचे? (स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया)
डिजिलॉकर लिंक करणे: ज्या उमेदवारांचे डिजिलॉकरवर खाते आहे, त्यांनी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील 'मेरी पेहचान' (Meri Pehchaan) पोर्टलद्वारे आपले खाते लिंक करणे आवश्यक आहे.
नवीन खाते उघडणे: ज्यांचे खाते नाही, त्यांनी https://www.digilocker.gov.in/ वर जाऊन आपल्या आधार क्रमांकाद्वारे त्वरित नोंदणी करावी.
कागदपत्रे सामायिक करणे (Consent): अर्ज करताना उमेदवारांना आपली कागदपत्रे सामायिक करण्यासाठी 'संमती' (Consent) द्यावी लागेल. एकदा दिलेली ही संमती 30 दिवसांपर्यंत वैध राहील.
कोणती कागदपत्रे कशी सादर करावीत?
जारी केलेली कागदपत्रे (Issued Documents): आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, 10 वी-12 वीची गुणपत्रके यांसारखी कागदपत्रे थेट डिजिलॉकरमधून उपलब्ध होतील.
इतर कागदपत्रे (MPSC Drive): अनुभव प्रमाणपत्रासारखी कागदपत्रे जी थेट डिजिलॉकरवर उपलब्ध नसतील, ती उमेदवारांना 'पीडीएफ' (PDF) स्वरूपात डिजिलॉकरमधील 'ड्राइव्ह'मध्ये अपलोड करून शेअर करता येतील.
आगामी काळात शिफारसपत्रेही मिळणार ऑनलाईन
आयोगाने स्पष्ट केले आहे की, आगामी काळात ज्या उमेदवारांची निवड होईल, त्यांची अंतिम शिफारसपत्रे (Recommendation Letters) देखील ऑनलाईन अर्ज प्रणालीसोबतच डिजिलॉकरवर उपलब्ध करून दिली जातील.
दरम्यान, माहिती तंत्रज्ञान नियम 2016 नुसार, डिजिलॉकरमधील कागदपत्रे ही मूळ (Physical) प्रमाणपत्रांइतकीच वैध मानली जातात. भविष्यात केवळ याच माध्यमातून कागदपत्रे स्वीकारली जातील, त्यामुळे सर्व उमेदवारांनी आत्तापासूनच या प्रणालीचा सराव आणि वापर सुरू करण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.