Baramati Plane Crash: पुणे जिल्ह्यातील बारामती परिसरात हवाई अपघातांची मालिका सुरूच असून, एका खासगी वैमानिक प्रशिक्षण संस्थेच्या लघू विमानाला भीषण अपघाताला सामोरे जावे लागले आहे. नियमित सरावासाठी उड्डाण घेतलेले हे प्रशिक्षण विमान अचानक तांत्रिक बिघाडामुळे अनियंत्रित झाले आणि परिसरातील शेतात कोसळले. या विमानात शिकाऊ वैमानिक उपस्थित होता. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि तातडीच्या आपत्कालीन यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली असली, तरी या वारंवार घडणाऱ्या प्रकरणांमुळे बारामती परिसरातील वैमानिक प्रशिक्षणाच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सुरक्षेच्या उपायांवर प्रशासनाचा हलगर्जीपणा?
गेल्या 8 महिन्यांच्या कालावधीत बारामती परिसरात घडलेला हा 3 रा विमान अपघात आहे. यापूर्वी 28 फेब्रूवारी 2026 रोजी ‘VSR व्हेंचर्स’ कंपनीचे ‘लीयरजेट’ हे चार्टर्ड विमान लँडिंगदरम्यान कोसळून अत्यंत भीषण शोकांतिका घडली होती. या भीषण दुर्घटनेत महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एकूण 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच, म्हणजेच मे महिन्यात, गोजुबावी गावच्या हद्दीत एका शिकाऊ विमानाला तांत्रिक अडचणींमुळे शेतात इमर्जन्सी लँडिंग करावे लागले होते. त्या अपघातात 2 जण बालंबाल वाचले होते. आता घडलेल्या या तिसऱ्या दुर्घटनेमुळे बारामती विमानतळावरील उड्डाण सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत आहे का, असा सवाल निर्माण झाला आहे.
डीजीसीएकडून अपघाताच्या कारणांचा सखोल तपास सुरू
घडलेल्या ताज्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) उच्चस्तरीय तपासाची चक्रे फिरवली आहेत. विमानाचे इंजिन अचानक बंद पडले होते की वैमानिकाच्या चुकीमुळे ही घटना घडली, याचा शोध घेतला जात आहे. वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, खासगी प्रशिक्षण संस्थांच्या विमानांचे तांत्रिक ऑडिट करण्याची आणि हवाई सुरक्षेच्या नियमावलीची कठोरपणे अंमलबजावणी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.