Nashik Accident: नाशिक जिल्ह्यात शनिवारी दुपारी एक गंभीर अपघात घडला आहे. सप्तशृंगगड दर्शनासाठी आलेल्या पिंपळगाव चिंचखेड येथील पाच भाविकांची बोलेरो कार (एमएच 15 बीएन 0555) घाटरस्त्यावरून नियंत्रण सुटून 700 ते 800 फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
गणपती पॉइंटजवळ अपघात
सप्तशृंगी देवीचे दर्शन घेऊन परतीच्या मार्गाने कार खाली उतरत असताना गणपती पॉइंटजवळ हा अपघात झाला. रस्त्याच्या कठड्याला धडक दिल्यानंतर वाहन सरळ दरीत कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अंदाजे 1000 फूट खोल दरीमुळे वाहन पूर्णपणे नजरेआड झाले असून मदतकार्य अत्यंत कठीण झाले आहे.
बचाव कार्यात मोठ्या अडचणी
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदत सुरू केली. त्यानंतर एनडीआरएफचे पथक आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरीची खोली 700 ते 800 फूट असल्याने बचाव पथकांना खाली उतरून अपघातग्रस्त वाहनापर्यंत पोहोचणे अवघड ठरत आहे.
डोंगराळ भागातील वारंवार अपघात
अपघात ज्या ठिकाणी झाला तो परिसर अत्यंत वळणाचा आणि जोखमीचा मानला जातो. याच भागात यापूर्वीही अनेक अपघात घडले असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. अपघाताचे नेमके कारण काय, वाहनाचे नियंत्रण सुटले की इतर काही कारण होते, याची चौकशी पोलीस करत आहेत. प्राथमिक निष्कर्षांनंतरच अधिकृत माहिती जाहीर केली जाईल, असे प्रशासनाने सांगितले. या भीषण अपघातानंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.