Shetkari Karjmukti Yojana: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; आधार पडताळणीची प्रक्रिया होणार सोपी; बोटांचे ठसे न उमटल्यास प्रशासनाने दिला ‘हा’ पर्याय

पात्र लाभार्थ्यांनी त्वरित 'आपले सरकार सेवा केंद्रात' जाऊन आपली ओळख पडताळणी (ऑथेंटिकेशन) पूर्ण करून घ्यावी, असे निर्देश पुणे ग्रामीण सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी दिले आहेत.

Shetkari Karjmukti Yojana: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; आधार पडताळणीची प्रक्रिया होणार सोपी; बोटांचे ठसे न उमटल्यास प्रशासनाने दिला ‘हा’ पर्याय

Shetkari Karjmukti Yojana:  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांसाठी आधार पडताळणीची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांनी त्वरित 'आपले सरकार सेवा केंद्रात' जाऊन आपली ओळख पडताळणी (ऑथेंटिकेशन) पूर्ण करून घ्यावी, असे निर्देश पुणे ग्रामीण सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी दिले आहेत. या प्रक्रियेत शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासनाने स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

अशी असेल ऑनलाईन पडताळणीची सोपी पद्धत

सेवा केंद्रावर गेल्यानंतर शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक किंवा यादीतील विशिष्ट ओळख क्रमांक केंद्र चालकाकडे देणे आवश्यक आहे. त्यानंतर 'ॲग्रीस्टॅक' पोर्टलवर संबंधित माहिती तपासून नोंदणी अपूर्ण असल्यास ती तात्काळ पूर्ण केली जाईल. संगणकावर स्क्रीनवर दिसणारा कर्ज खाते क्रमांक आणि थकीत रकमेची योग्य खात्री केल्यानंतर बायोमेट्रिक (बोटांचे ठसे) पद्धतीने प्रमाणीकरण केले जाईल आणि शेतकऱ्यांना त्याची अधिकृत पावती दिली जाईल.

माहितीत तफावत असल्यास घाबरू नका; अशी नोंदवा तक्रार

एखाद्या शेतकऱ्याचा आधार क्रमांक किंवा कर्जाच्या रकमेत काही चूक आढळली, तरीही प्रक्रिया थांबवण्याची गरज नाही. मूळ आधारकार्ड दाखवून बायोमेट्रिक प्रमाणीकरण पूर्ण करावे आणि त्यासोबतच असहमती किंवा तक्रार नोंदवावी. या तक्रारी पुढील छाननीसाठी थेट जिल्हास्तरीय समितीकडे वर्ग केल्या जातील आणि शेतकऱ्याला तक्रार नोंदवल्याची पावती तात्काळ दिली जाईल.

हेही वाचा – Farmer Loan Waiver: कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीत 16.95 लाख शेतकरी! 56 लाखांपर्यंत लाभार्थ्यांना मिळणार दिलासा; कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा

बायोमेट्रिक न उमटल्यास केंद्र चालक करणार पडताळणी

वयस्कर किंवा शेतात काम करणाऱ्या ज्या शेतकऱ्यांचे बोटांचे ठसे संगणकावर उमटत नाहीत, त्यांच्यासाठी प्रशासनाने विशेष सोय केली आहे. इतर बोटांचे ठसे वापरूनही यश न आल्यास प्रणालीतील 'अनेबल टू ऑथेंटिकेट' (Unable To Authenticate) हा पर्याय निवडता येईल. अशा परिस्थितीत केंद्र चालक स्वतःचे बायोमेट्रिक देऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकेल. या प्रकारच्या अर्जांची नोंद थेट तहसीलदारांकडे केली जाईल, त्यामुळे एकाही पात्र शेतकऱ्याचा लाभ हुकणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number