Anant Garje Bail : राज्याच्या राजकारणात चर्चेत राहिलेल्या डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरणात मोठी कायदेशीर घडामोडी समोर आली आहे. आपल्या पत्नीला जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप असलेले पती अनंत गर्जे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणातील तपासाचे गांभीर्य आणि गंभीर आरोप पाहता, अवघ्या तीन महिन्यांत मिळालेला जामीन चर्चेचा विषय ठरला आहे.
काय आहेत गंभीर आरोप?
डॉ. गौरी पालवे या केईएम रुग्णालयात दंतवैद्यक म्हणून कार्यरत होत्या. फेब्रुवारी 2025 मध्ये त्यांचा विवाह अनंत गर्जे यांच्याशी झाला होता. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच त्यांच्या संसाराला ग्रहण लागले. अनंत गर्जे यांचे दुसऱ्या महिलेशी संबंध असल्याचे उघड झाल्याने वादाची ठिणगी पडली होती. सासरच्या मंडळींकडून मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याचा दावा गौरी यांच्या माहेरच्यांनी केला आहे. गौरी यांनी वरळीतील राहत्या घरी गळफास घेतल्याचे समोर आले असले, तरी हा घातपात असल्याचा संशय त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी मांडल्या ‘त्या’ 20 मिनिटांच्या ऑडिओ क्लिप
या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे 6 फेब्रुवारीच्या सुनावणीत पोलिसांनी सादर केलेल्या ऑडिओ क्लिप. अनंत गर्जेने स्वतः रेकॉर्ड केलेल्या 20 मिनिटांच्या क्लिपमध्ये, त्याने गौरी यांना मारहाण केल्याचे मान्य केल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. जुन्या प्रेमप्रकरणाची माहिती बाहेर आल्यास जीवन संपवण्याची धमकी देऊन अनंत हा गौरींवर दबाव टाकत असल्याचा दावाही सरकारी पक्षाने केला होता.
संसाराचा अवघ्या काही महिन्यांतच अंत
अनंत आणि गौरी यांचा विवाह अत्यंत उत्साहात पार पडला होता. केईएममधील सहकारी डॉ. गौरी यांच्या कामाचे आणि स्वभावाचे कौतुक करत असतं. मात्र, या सुखी संसारामागे कौटुंबिक हिंसाचाराचे आणि अनैतिक संबंधांचे काळे सावट होते, जे गौरी यांच्या मृत्यूनंतर चव्हाट्यावर आले. पोलिसांनी याप्रकरणी सखोल तपास सुरू ठेवला असला तरी, मुख्य आरोपीला जामीन मिळाल्याने पीडित कुटुंबाला धक्का बसला आहे.