Salman Khan Instagram Account: बॉलिवूडचा 'सुपरस्टार' सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘मातृभूमी’ (Matrubhoomi) या चित्रपटामुळे जेवढा चर्चेत आहे, तेवढाच तो सोशल मीडियावरील घडामोडींमुळे प्रसिद्धीझोतात आला आहे. पापाराझींसोबत झालेल्या एका वादानंतर सलमानने इन्स्टाग्रामवर काही गूढ पोस्ट शेअर केल्या होत्या. या वादाची चर्चा सुरू असतानाच, अचानक सलमानचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट गायब झाल्याने सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली होती.
'पेज नॉट फाउंड'मुळे तर्कवितर्कांना उधाण
नेहमीप्रमाणे चाहत्यांनी जेव्हा सलमानची इन्स्टाग्राम प्रोफाइल सर्च केली, तेव्हा तिथे ‘Sorry, this page isn't available’ असा मेसेज स्क्रिनवर झळकला. अब्जावधी फॉलोअर्स असलेल्या अभिनेत्याचे अकाऊंट अचानक दिसेनासे झाल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. भाईजानने रागाच्या भरात स्वतःचे अकाऊंट डिलीट किंवा डीॲक्टिव्हेट केले की त्याचे अकाऊंट हॅक झाले, अशा विविध चर्चांना इंटरनेटवर उधाण आले.
सोशल मीडियावर स्क्रीनशॉट व्हायरल
सलमानचे अकाऊंट गायब होताच अवघ्या काही मिनिटांतच त्याचे स्क्रीनशॉट्स 'X' (ट्विटर) आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुफान व्हायरल झाले. अनेक चाहत्यांनी अभिनेत्याच्या सुरक्षिततेबद्दल काळजी व्यक्त केली. मात्र, हा गोंधळ आणि सस्पेन्स जास्त काळ टिकला नाही. अकाऊंट गायब झाल्यानंतर अवघ्या 30 मिनिटांतच सलमानची प्रोफाइल पुन्हा सक्रिय झाली आणि चाहत्यांचा जीव भांड्यात पडला.
तांत्रिक बिघाड की हॅकिंगचा प्रयत्न?
इन्स्टाग्रामवर 72 दशलक्षांपेक्षा जास्त फॉलोअर्स असलेल्या सलमान खानच्या अकाऊंटसोबत नेमके काय घडले होते, यावर अद्याप सलमान किंवा त्याच्या मॅनेजमेंट टीमकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे हा एखादा तांत्रिक बिघाड होता की हॅकिंगचा प्रकार, याबाबत अद्याप रहस्य कायम आहे.