BCCI Board Meeting: भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची अचानक बैठक बोलावली आहे. सामन्याच्या काही तास आधी झालेली ही बैठक अनेक महत्त्वाचे संकेत देत आहे.
अचानक बैठक का?
स्पोर्टस्टारच्या माहितीनुसार, बैठकीत बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया, संयुक्त सचिव प्रभतेज सिंग भाटिया, प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर उपस्थित राहणार आहेत. बोर्डचे नवे अध्यक्ष मिथुन मन्हास उपस्थित राहतील की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र विराट कोहली, रोहित शर्मा किंवा इतर वरिष्ठ खेळाडूंना बैठकीस आमंत्रित केले जाण्याची शक्यता कमी आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, बैठकीचा मुख्य उद्देश 'संघ निवडीत सातत्य आणणे आणि भविष्यातील योजनांवर स्पष्टता निर्माण करणे' असा आहे.
हेही वाचा – IND vs SA: निराशाजनक कामगिरीनंतर भारताचा दमदार कमबॅक; साऊथ आफ्रिकेवर दणदणीत विजय
कसोटी मालिकेतील पराभवामुळे बोर्डात चिंता
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मैदानावरील कसोटी मालिकेत झालेल्या पराभवामुळे बोर्डाला अनेक प्रश्नांवर विचार करावा लागला आहे. बैठकीत मुख्यत्वे संघाच्या अलिकडच्या सामन्यांमध्ये घेतलेल्या चुकीच्या निर्णयांची समीक्षा, व्यवस्थापन आणि खेळाडूंमधील संवादातील तफावत, संघाच्या दीर्घकालीन योजनांना बळकटी देणे आदी मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – Sunil Gavaskar: सुनिल गावसकरांचा साऊथ आफ्रिकेच्या कोचला सल्ला; “वक्तव्य मागे घेऊन स्पष्टीकरण द्या”
कोहली आणि रोहितच्या भूमिकेवर चर्चा होईल का?
गेल्या काळात चर्चा सुरू आहे की बोर्ड विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमध्ये परतण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, रांची वनडेनंतर कोहलीने स्वतः पुनरागमनाची शक्यता नाकारली आहे. यावेळी व्यवस्थापन, निवड समिती आणि वरिष्ठ खेळाडूंमधील मतभेद दूर करण्याची शक्यता आहे. दुसऱ्या वनडेच्या अगदी आधी झालेली ही अचानक बैठक टीम इंडियाच्या निवड धोरणावर आणि संघाच्या भविष्यातील दिशा ठरवण्यात निर्णायक ठरू शकते.