Baba Ram Rahim on Parole : दोन साध्वींवरील बलात्कार आणि एका पत्रकाराच्या हत्येप्रकरणी रोहतकच्या सुनारिया तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याला पुन्हा एकदा 40 दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. काल संध्याकाळी यासंदर्भातील आदेशावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर तुरुंग प्रशासनाने त्याच्या सुटकेची प्रक्रिया तातडीने सुरू केली. नववर्षाच्या सुरुवातीलाच मिळालेली ही सवलत राम रहीमसाठी एक प्रकारचे 'स्पेशल गिफ्ट' मानले जात आहे.
या पॅरोलच्या कालावधीत राम रहीमला हरियाणातील सिरसा येथील डेरा सच्चा सौदामध्येच राहावे लागणार आहे. प्रशासनाने त्याच्यावर कडक अटी लादल्या असून, डेरा परिसराच्या बाहेर कोणत्याही सार्वजनिक किंवा राजकीय कार्यक्रमात सहभागी होण्यास त्याला सक्त मनाई करण्यात आली आहे. त्याच्या प्रत्येक हालचालीवर स्थानिक प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे, जेणेकरून कोणत्याही नियमाचे उल्लंघन होणार नाही.
बलात्कार आणि हत्येसारख्या भयंकर गुन्ह्यांमध्ये शिक्षा
राम रहीमच्या शिक्षेचा इतिहास पाहिल्यास, 25 ऑगस्ट 2017 रोजी त्याला पहिल्यांदा बलात्काराच्या गुन्ह्यात 10 वर्षांची शिक्षा झाली होती. त्यानंतर 11 जानेवारी 2019 रोजी पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येप्रकरणी त्याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. गंभीर गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगत असूनही त्याला वारंवार मिळणारा पॅरोल आणि फर्लो हा नेहमीच राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी असलेला मानला जातो. यामुळे यावरून नेहमीच वाद होत राहतो. विशेषतः निवडणुकांच्या काळात त्याला मिळणाऱ्या या सवलतींमुळे प्रशासनावर नेहमीच टीका होत आली आहे.
सव्वा वर्षांहून अधिक काळ तुरुंगाबाहेर चैनीत
एका अहवालानुसार, गेल्या 8 वर्षांच्या शिक्षेच्या कालावधीपैकी सव्वा वर्षांहून अधिक काळ त्याने तुरुंगाबाहेरच चैनीत घालवला आहे. यावेळी मिळणारे 40 दिवस धरल्यास, त्याच्या तुरुंगाबाहेरील दिवसांची एकूण संख्या 400 च्या पुढे जाणार आहे. 2022 मध्ये हरियाणा सरकारने 'हरियाणा गुड कंडक्ट टेम्पररी प्रिझनर्स अॅक्ट'मध्ये केलेल्या सुधारणेचा सर्वाधिक फायदा राम रहीमला झाल्याचे बोलले जाते, ज्यामुळे त्याला सातत्याने या कायदेशीर सवलतींचा 'जॅकपॉट' मिळत राहिला आहे.
हा पॅरोलचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर राम रहीमला पुन्हा रोहतकच्या सुनारिया तुरुंगात हजर व्हावे लागेल. कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून ही सवलत दिली गेल्याचे सरकार सांगत असले, तरी एका गुन्हेगाराला इतक्या मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या सवलतींमुळे सामान्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा – Maoists Killed in Chhattisgarh: छत्तीसगडमध्ये मध्यरात्री थरार; सुरक्षा दलाने 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान