Monsoon Update : ऑगस्ट महिन्यात पावसाचा लपंडाव? ‘एल निनो’चे संकट गडद; मान्सून ब्रेकमुळे चिंता वाढण्याची शक्यता

जुलै महिन्यातील दमदार हजेरीनंतर ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून पावसाची गती मंदावण्याची शक्यता वर्तवली आहे.

Monsoon Update : ऑगस्ट महिन्यात पावसाचा लपंडाव? ‘एल निनो’चे संकट गडद; मान्सून ब्रेकमुळे चिंता वाढण्याची शक्यता

India August Weather Update : बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाचा पट्टा, वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि राजस्थानवरील चक्राकार वारे यामुळे सध्या उत्तर आणि मध्य भारतात पावसाचा मोठा जोर पाहायला मिळत आहे. मात्र, जुलै महिन्यातील दमदार हजेरीनंतर ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून पावसाची गती मंदावण्याची शक्यता भारतीय हवामान विभाग (IMD) आणि स्कायमेटने वर्तवली आहे. ‘अल निनो’चा प्रभाव तीव्र होत असल्याने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यानंतर पाऊस प्रदीर्घ ब्रेक घेऊ शकतो, ज्यामुळे हवामानातील उकाडा वाढून पाण्यासाठी नागरिकांची वणवण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.  

हिमाचल अन् उत्तराखंडमध्ये ढगफुटी आणि भूस्खलनाचा हाय अलर्ट
हवामान प्रणालीच्या तिहेरी प्रभावामुळे डोंगराळ भागांमध्ये पुढील 3 ते 4 दिवस परिस्थिती अत्यंत संवेदनशील राहण्याचा अंदाज आहे. विशेषतः हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये 31 जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शिमला, मनाली, कुल्लू, मंडी, धर्मशाला, ऋषिकेश, डेहराडून आणि नैनीताल यांसारख्या भागांत ढगफुटी, भूस्खलन आणि चिखल साचून जनजीवन विस्कळीत होण्याचा मोठा धोका वर्तवण्यात आला आहे.

देशभरातील इतर राज्यांत पावसाची सद्यस्थिती
पुढील 48 तासांत दिल्ली-एनसीआर, पंजाबमधील अमृतसर, गुरुदासपूर आणि हरियाणातील हिसार, सिरसा भागात मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे. पूर्व राजस्थानमध्ये धुवांधार पाऊस सुरू असून 30 ते 31 जुलैदरम्यान जैसलमेर, बीकानेर आणि बाडमेरसह संपूर्ण राज्य पावसाने व्यापले जाईल. तर पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पावसाचा जोर कमी होऊन हलक्या सरी बरसतील. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पुढील 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे.

महाराष्ट्रातील स्थिती: विदर्भात जोर, मराठवाडा कोरडाच राहण्याची शक्यता
महाराष्ट्राचा विचार केल्यास नागपूर, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या विदर्भातील जिल्ह्यांसह दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग व गोव्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे अन् पालघरमध्ये पावसाचा जोर ओसरलेला राहील. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मात्र अजूनही पावसाची तूट कायम असून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पाऊस उघडीप देईल आणि दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी परततील. गुजरातमध्ये बहुतांश भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.  

हेही वाचा – E Pik Pahani Update: सर्व्हर डाऊन अन् नेटवर्कच्या अडचणींवर अखेर तोडगा; ई-पीक पाहणीबाबत सरकारने केला ‘हा’ मोठा बदल

प्रशांत महासागरात ‘अल निनो’चा तीव्र प्रभाव
हवामान तज्ज्ञांच्या मते, प्रशांत महासागरातील अल निनो प्रचंड मजबूत स्थितीत पोहोचला असून 3.4 इंडेक्सचा तापमान दर 1.4 अंशांवर गेला आहे. 2015-2016 च्या महा-अल निनोच्या काळात हे तापमान 2.75 अंश होते, परंतु या वेळी ते 3 अंशांच्या पार जाऊन 2027 च्या वसंत ऋतूपर्यंत टिकून राहण्याची भीती आहे. जून महिन्यात देशात पावसाची 40 टक्के तूट होती, ती जुलैच्या दमदार पावसाने भरून काढली असली तरी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अल निनोमुळे पावसाचे प्रदीर्घ स्पेल कमी होण्याचा धोका आहे.  

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब अन् पाण्याचा साठा
ऑगस्टमध्ये पावसाने विश्रांती घेतली तरी जुलै महिन्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा उपलब्ध झाला आहे. तसेच देशातील विविध जलाशयांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे ऑगस्टच्या सुरुवातीला पाऊस कमी झाला तरी पिकांचे तात्काळ किंवा मोठे नुकसान होणार नाही, असा दिलासादायक अंदाज स्कायमेटने दिला आहे. तथापि, दीर्घकालीन पावसाच्या अनियमिततेमुळे पाण्याचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे ठरणार आहे.

हेही वाचा – Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी अडचणी, कृषिमंत्र्यांनी राष्ट्रीयकृत बँकांना सुनावले खडेबोल; कर्जमुक्तीबाबत काय म्हणाले दत्तात्रय भरणे?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number