LTT Traffic Block: मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) रेल्वे स्थानकाच्या परिसरात सध्या विविध तांत्रिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यामध्ये रेल्वे गाड्यांच्या मार्गबदलासाठी आवश्यक असणारे शंटिंग नेकचे बांधकाम, सिक साइडिंगमधील महत्त्वाचे बदल, देखभाल यार्डचे आधुनिकिकरण आणि पिट लाईन्सचा विस्तार यांसारख्या मोठ्या कामांचा समावेश आहे. ही सर्व कामे विनाअडथळा आणि जलदगतीने पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने या भागात सलग 48 तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
असे असेल ब्लॉकचे वेळापत्रक
ब्लॉकचा कालावधी: रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, हा सलग 2 दिवसांचा ब्लॉक 14 जून रोजी सकाळी 8:00 वाजल्यापासून सुरू होईल, जो थेट 16 जून रोजी सकाळी 8:00 वाजेपर्यंत कायम राहील. या 48 तासांच्या काळात एलटीटी स्थानकाकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर याचा मोठा परिणाम होणार आहे.
कोकण मार्गावरील 'या' दोन गाड्यांच्या प्रवासात बदल
या मेगाब्लॉकचा सर्वाधिक फटका कोकण रेल्वेच्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे. प्रवाशांची गर्दी असणाऱ्या 'नेत्रावती' आणि 'मत्स्यगंधा' या 2 एक्स्प्रेसच्या प्रवासात प्रशासनाने तात्पुरते बदल केले आहेत:
नेत्रावती एक्स्प्रेस (गाडी क्र. 16346): 13 आणि 14 जून रोजी तिरुवनंतपुरम येथून सुटणारी ही गाडी एलटीटीपर्यंत न जाता ठाणे स्थानकावरच आपली सफर संपवेल.
मत्स्यगंधा एक्स्प्रेस (गाडी क्र. 12620): मंगळुरु सेंट्रल येथून सुटणारी ही गाडी देखील लोकमान्य टिळक टर्मिनसऐवजी ठाणे रेल्वे स्थानकावरच शॉर्ट-टर्मिनेट केली जाईल.
प्रवाशांना ठाण्यातच उतरावे लागणार; रेल्वेचे आधीच नियोजनाचे आवाहन
या तात्पुरत्या बदलामुळे ज्या प्रवाशांनी लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) पर्यंतचे तिकीट बुक केले आहे, त्यांना आता ठाणे स्थानकावरच उतरावे लागणार आहे. तिथून मुंबई शहरात किंवा पुढील प्रवासासाठी प्रवाशांना लोकल ट्रेन अथवा इतर वाहनांचा आधार घ्यावा लागेल. ऐनवेळी होणारी धावपळ आणि गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे आगाऊ नियोजन करावे, तसेच गाड्यांच्या अचूक वेळेसाठी केवळ रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळालाच भेट द्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.