Nashik IT Company Conversion Case: नाशिक शहरातील एका नामांकित आयटी कंपनीत समोर आलेले धर्मांतर आणि महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण आता अधिक गंभीर वळणावर पोहोचले आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) पहिली मोठी कारवाई करत मुख्य आरोपी शफी शेख आणि रझा मेमन यांना आपल्या ताब्यात घेतले आहे. नाशिक विशेष तपास पथकाकडून (SIT) या दोन्ही आरोपींचा ताबा घेतल्याने आता या प्रकरणामागील आंतरराष्ट्रीय धागेदोरे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एटीएसच्या एन्ट्रीमुळे खळबळ
हे प्रकरण केवळ धर्मांतर आणि अत्याचारापुरते मर्यादित नसून, त्यामागे एक मोठे रॅकेट असण्याचा तपास यंत्रणांना दाट संशय आहे. या प्रकरणाचा संबंध 'टेरर फंडिंग' (दहशतवादी कारवायांसाठी वित्तपुरवठा) आणि आंतरराष्ट्रीय कनेक्शनशी असू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत असल्याने एटीएसने या तपासात उडी घेतली आहे. आरोपींनी नेमक्या कोणाच्या सांगण्यावरून हे कृत्य केले आणि या संपूर्ण रॅकेटसाठी त्यांना कोठून आर्थिक रसद मिळत होती, याचा सखोल शोध आता एटीएस घेणार आहे.
निदा खानचा लपंडाव आणि पोलिसांची शोधमोहीम
या प्रकरणातील महत्त्वाची दुवा मानली जाणारी निदा खान अद्यापही फरार असून तिने पोलिसांना जेरीस आणले आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, निदा खान वारंवार आपले लोकेशन बदलून पोलिसांना गुंगारा देत आहे. ती मूळची भिवंडीची असून गेल्या 2 वर्षांपासून मुंब्रा परिसरात वास्तव्यास होती. तिने स्वतः गरोदर असल्याची माहिती पोलिसांना दिली असली तरी, ती अद्याप समोर आलेली नाही. नाशिक एसआयटीने तिच्या पतीची चौकशी केली असून, ती जवळच्या व्यक्तींच्या माध्यमातून पोलिसांच्या संपर्कात असल्याचा संशय आहे, मात्र अद्याप ती हाती लागलेली नाही.
हेही वाचा – संतापजनक! आचाऱ्याला एवढा राग अनावर झाला की चिमुकल्याला पेटत्या तंदूरमध्ये फेकलं, कारण…
तपासाचा परीघ विस्तारला
या प्रकरणातील मुख्य आरोपी ताब्यात आल्यामुळे आयटी कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांचेही जबाब नोंदवले जाण्याची शक्यता आहे. महिला कर्मचाऱ्यांचे शोषण करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला गेला आणि धर्मांतरासाठी कोणावर दबाव टाकला गेला का, या सर्व बाबी आता एटीएसच्या चौकशीत स्पष्ट होतील. या कारवाईमुळे नाशिकसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून, यामागे काही मोठी शक्ती कार्यरत आहे का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.