Pune Crime News: पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका गुप्त मोहिमेद्वारे जिल्ह्यात आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धडक कारवाई केली आहे. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रात सुरू असलेल्या एका बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश करत पोलिसांनी लाखो लिटर घातक आणि विषारी दारू बनवण्याचा एक मोठा डाव वेळेत हाणून पाडला. या कारवाई दरम्यान मानवी आरोग्याला अत्यंत घातक ठरू शकणारे हजारो किलो रासायनिक द्रव्ये आणि अंमली पदार्थांच्या निर्मितीसाठी लागणारी अत्याधुनिक यंत्रसामग्री जप्त करण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे बेकायदेशीर रसायनांची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
4 आरोपींच्या मुसक्या आवळल्या; मेफेड्रॉन निर्मितीच्या मशीनही हस्तगत
पोलिसांनी केलेल्या सखोल तपासामध्ये हा संपूर्ण अवैध कारखाना किशोर दत्तात्रय सुर्वे, शैलेश विठ्ठल ठाकूर, नबी सरवर जमीर सिद्दीकी आणि आदेश विठ्ठल पाचांगणे हे चौघे मिळून चालवत असल्याचे उघड झाले आहे. यातील मुख्य जागा सुर्वे याच्या मालकीची असून, तिथे सापडलेले घातक केमिकल शैलेश ठाकूर याने तयार केले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून संशयास्पद पिवळसर स्फटिक पदार्थांसह अंमली पदार्थ (मेफेड्रॉन) बनवण्यासाठी अत्यंत आवश्यक असणारे सेंट्रीफ्युगल आणि GLR मशीन देखील जप्त केले आहे. या जप्त केलेल्या हायटेक मशीनची बाजारपेठेत अंदाजे किंमत 1 कोटी रुपये एवढी आहे.
फॉरेन्सिक लॅबच्या अहवालातून धक्कादायक खुलासा; 15 लाख लिटर विषारी दारूचा कट उधळला
कारखान्यातून जप्त करण्यात आलेल्या रसायनांची पुणे येथील न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेकडून (FSL) तातडीने तपासणी करण्यात आली. या चाचणीच्या अहवालानुसार, तो स्फटिकसदृश पदार्थ दुसरा काही नसून मानवी शरीरासाठी प्रतिबंधित असलेले 'कोरल हायड्रेट' हे रासायनिक द्रव्य असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी या छाप्यात 3420 किलो कोरल हायड्रेट आणि ते तयार करण्यासाठी लागणारे तब्बल 5800 लिटर कच्चे केमिकल (रॉ-केमिकल) जप्त केले आहे. तज्ज्ञांच्या मते, या 3420 किलो रसायनाचा वापर करून सुमारे 15 लाख लिटर विषारी आणि जीवघेणी दारू तयार केली जाणार होती. मात्र, पोलिसांनी वेळीच केलेल्या कारवाईमुळे हा मोठा अनर्थ टळला आहे.