Ankita Lokhande Hijab Controversy: बॉलिवूड आणि टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या तिचा पती विकी जैनसोबत अबू धाबीमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. या सहलीचे विविध फोटो आणि व्हिडिओ ती सातत्याने सोशल मीडियावर शेअर करत असून, सध्या तिच्या काही फोटोंमुळे ती ऑनलाइन ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. या सहलीदरम्यान अंकिताने हिजाब परिधान करून एका प्रसिद्ध मशिदीला भेट दिली होती, ज्याचे फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटले आहे. या फोटोंवरून काहींनी तिच्यावर कडक शब्दांत आक्षेप घेतला आहे, तर काहींनी तिचे समर्थन केले आहे.
अंकिताने शेअर केले सहलीचे क्षण
अंकिता लोखंडेने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर अबू धाबी सहलीच्या आठवणी सांगणारे अनेक फोटो शेअर केले आहेत. तिने पोस्ट केलेल्या फोटोंच्या मालिकेमध्ये काही ठिकाणी ती पाश्चात्य पोशाखात दिसत आहे, तर मशिदीला भेट देतानाच्या फोटोंमध्ये तिने हिजाब परिधान केल्याचे दिसून येत आहे. हिजाबमधील या फोटोंमध्ये पती विकी जैनदेखील तिच्यासोबत पोझ देताना दिसत आहे. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये अंकिताने लिहिले, “माझ्या कॅमेरा रोलमधून अबू धाबीवरील थोडेसे प्रेम… फिरणे, हसणे आणि आठवणींची साठवण करणे.” मात्र, तिची हीच पोस्ट ट्रोलर्ससाठी चर्चेची ठरली आहे.
कमेंट बॉक्समध्ये नेटकऱ्यांचा संताप आणि समर्थनाचा सूर
अंकिताचे हे फोटो समोर येताच सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या एका गटाने तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. कमेंट बॉक्समध्ये अनेकांनी “तिने हे का परिधान केले? याची तिला काय गरज पडली होती?” आणि “हिजाब का घातला?” असे संतप्त सवाल उपस्थित केले. दुसरीकडे, अनेकांनी अंकिताची बाजू घेत ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर दिले. समर्थकांनी लिहिले की, “मशिदीच्या आवारात प्रवेश करण्यासाठी हा मुळात एक ‘ड्रेस कोड’ आहे; अगदी ज्याप्रमाणे आपल्याकडे मंदिरांमध्ये प्रवेश करण्यासाठी विशिष्ट पोशाखाचे नियम असतात, तसेच हे आहे.” यावरून सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
‘पवित्र रिश्ता’ ते ‘बिग बॉस 17’; अंकिता लोखंडेचा यशस्वी प्रवास
अंकिता लोखंडेने 2009 ते 2014 या काळात प्रसारित झालेल्या ‘पवित्र रिश्ता’ या अत्यंत लोकप्रिय मालिकेद्वारे टीव्ही विश्वात पदार्पण केले आणि ती घराघरात पोहोचली. त्यानंतर तिने 2019 मध्ये ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झाशी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. पुढे ती ‘बाघी 3’, ‘द लास्ट कॉफी’ आणि ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यांसारख्या महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये झळकली. याशिवाय, तिने ‘झलक दिखला जा 4’, ‘स्मार्ट जोडी’, ‘बिग बॉस 17’ आणि ‘लाफ्टर शेफ्स – अनलिमिटेड एंटरटेनमेंट’ यांसारख्या अनेक गाजलेल्या रिअॅलिटी शोमध्येही सहभाग घेतला असून, ती मनोरंजन सृष्टीतील एक आघाडीचे नाव आहे.