मुंबई : महाराष्ट्रातील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे मुद्दे चव्हाट्यावर आणून खळबळ उडवून देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे पती अनीश दमानिया यांची राज्य सरकारच्या महत्त्वाच्या थिंक टँक ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ (MITRA – मित्रा) मध्ये मानद सल्लागार म्हणून नियुक्ती झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये काही शुभेच्छांसह काही प्रमाणात टीका केली जात आहे. अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन या टीकेवर स्पष्टीकरण दिले आहे.
अनीश दमानियांची नियुक्ती कशी झाली?
या नियुक्तीमागचा घटनाक्रम सांगताना अंजली दमानिया म्हणाल्या की, त्यांचे पती त्यांच्या ‘जे.एम. फायनान्शियल’ या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. याच कामासाठी त्यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली होती. यावेळी गोयल यांनी अनीश दमानियांना त्यांच्या कामाचा अनुभव लक्षात घेऊन ‘फिक्की’ (FICCI) समितीचे सदस्य होण्याची विनंती केली. या विनंतीचा मान ठेवून अनीश यांनी ‘फिक्की’ चे सदस्यत्व स्वीकारले. त्यानंतर, थेट केंद्रातून सूत्रे हलली आणि त्यांना ‘मित्रा’ संस्थेच्या मानद सल्लागारपदाची ऑफर देण्यात आली. या पदासाठी एकही रुपया न घेता केवळ कॅपिटल मार्केटमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे, असे अंजली दमानिया यांनी सांगितले.
‘माझ्यासाठी ही अभिमानाची बाब’
अंजली दमानिया यांनी या नियुक्तीचे समर्थन करताना सांगितले की, “मी महाराष्ट्रासाठी काम करते, आता माझे पती देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी काम करणार आहेत. त्यांच्याकडे पाच पदव्या आहेत आणि त्यांच्या अनुभवाचा सरकारने आदर केला आहे. यात लपवण्यासारखे काहीच नाही, उलट ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”
‘मित्रा’ संस्थेने ही माहिती लिंक्डइनवर शेअर केल्यावर, अनीश आणि नंतर अंजली दमानिया यांनीही ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.
रोहित पवारांची X पोस्ट आणि उपरोधिक टीका
या घडामोडीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रोहित पवार (Rohit Pawar) यांनी समाजमाध्यमांवर उपरोधिक टिप्पणी केली. “महाराष्ट्र सरकारची थिंक टँक असलेल्या ‘मित्रा’ या संस्थेवर मानद सल्लागारपदी अनिश दमानिया यांची नेमणूक झाल्याबद्दल अभिनंदन. एकीकडे भ्रष्टाचाराची प्रकरणे काढून अंजली दमानिया सामाजिक क्षेत्रात योगदान देत आहेत. आता अनिश दमानिया यांचे आर्थिक विकासाच्या क्षेत्रात सरकारला मार्गदर्शन लाभणार आहे. दमानिया कुटुंबाचे आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातील समन्वय निश्चितच महत्त्वपूर्ण राहील. पुनश्च एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा,” असे त्यांनी म्हटले आहे. यावर प्रत्युत्तर देताना अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर परखड प्रतिक्रिया दिली. “रोहित पवार यांचा समाज माध्यमावरील संदेश वाचल्यावर मला तितकस वाईट वाटले नाही. हे तर अपेक्षित होते,’ असे म्हटले आहे.
महाराष्ट्र सरकारची think tank असलेल्या मित्रा (MITRA) च्या मानद सल्लागारपदी अनिश दमानिया यांची नेमणूक झाल्याबद्दल अभिनंदन..! एकीकडे भ्रष्टाचाराची प्रकरणे काढून @anjali_damania ताई ‘सामाजिक’ क्षेत्रात योगदान देत आहेत आता अनिश जी यांचे ‘आर्थिक विकासाच्या’ क्षेत्रात सरकारला… pic.twitter.com/XXsS2DEYWB — Rohit Pawar (@RRPSpeaks) September 15, 2025
हेही वाचा – BMC Elections: जागा वाटपावरून महायुतीत तिढा? भाजपची 150 जागांची मागणी, शिंदे गटही 100 जागांवर ठाम
पत्रकारांवर चुकीच्या पद्धतीने बातम्या दिल्याचा आरोप
या नियुक्तीवर काही पत्रकारांनी चुकीच्या पद्धतीने बातम्या दिल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला. त्या म्हणाल्या, “दोन पत्रकारांनी या नियुक्तीचा वाट्टेल तसा अर्थ काढून खळबळ उडवण्याचा प्रयत्न केला. पण, माझ्या पतीला त्यांच्या कर्तृत्वामुळे हे पद मिळाले आहे. ते राजकारणापासून दूर राहून देशासाठी निःस्वार्थपणे काम करत आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्या देणं थांबवलं पाहिजे.”