Crime News : चोरी करायला गेले अन् मार खायची वेळ आली; चोरांनी थेट पोलिसांना केला फोन, ‘आम्हाला वाचवा…’

दोन चोरट्यांनी एका बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला, मात्र स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे ते तिथेच अडकले. अखेर लोकांच्या तावडीतून सुटण्यासाठी त्यांनी थेट पोलिसांनाच फोन केला.

Crime News : चोरी करायला गेले अन् मार खायची वेळ आली; चोरांनी थेट पोलिसांना केला फोन, ‘आम्हाला वाचवा…’

Burglars dial Police : एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. मात्र, नंतर स्वतःच फोन करून पोलिसांना बोलावले. या एका थरारक आणि तितक्याच विचित्र घटनेची नोंद झाली. खरे तर, आजूबाजूच्या लोकांच्या सतर्कतेमुळे हे चोर चोरी करू शकले नाहीत. उलट, त्यांच्याच जिवाला भीती निर्माण झाली. अखेर, जमावाच्या तावडीतून सुटण्यासाठी स्वतःचा मार्ग न उरल्याने, या चोरांनी चक्क स्वतःच पोलिसांच्या 112 या आपत्कालीन क्रमांकावर फोन करून मदतीची याचना केली. ओडिशातील रुरकेला येथील बसंती कॉलनीमध्ये 29 एप्रिलच्या रात्री ही घटना घडली.

सतर्क शेजाऱ्यांमुळे चोरटे जाळ्यात
दोन चोरट्यांनी एका बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला, मात्र स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे ते तिथेच अडकले. ही घटना एका दुमजली घरात घडली. येथे भाडेकरू माधव किसन आणि घरमालक गणेश बिस्वाल दोघेही घरी नव्हते. 30 वर्षीय नानक सिंग आणि 32 वर्षीय सत्येंद्र कुमार सिंग यांनी रात्रीच्या सुमारास गेटचे कुलूप तोडून तळमजल्यावर प्रवेश केला. या वेळी टीव्ही पाहत असलेल्या एका वृद्ध शेजाऱ्याला घरातून संशयास्पद आवाज आल्याने त्यांनी तातडीने इतर रहिवाशांना सावध केले. काही वेळातच कॉलनीतील लोक जमा झाले आणि त्यांनी घराचे मुख्य गेट तसेच छतावर जाण्याचा मार्ग बाहेरून बंद करून चोरट्यांना आतच कोंडले.

जीव वाचवण्यासाठी '112' ला कॉल
घराबाहेर लोकांचा मोठा आरडाओरडा आणि वाढती गर्दी पाहून आत अडकलेल्या चोरट्यांची घाबरगुंडी उडाली. जमाव घरात घुसून आपल्याला मारहाण करेल या भीतीने त्यांनी पोलिसांना फोन लावला आणि स्वतःच्या कुटुंबीयांनाही या परिस्थितीची कल्पना दिली. पहाटे 2:30 च्या सुमारास पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी संतप्त जमावाला शांत केले आणि दोन्ही आरोपींना सुरक्षितपणे ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले, अन्यथा जमावाने त्यांना बेदम चोप दिला असता.

हेही वाचा – Rahul Gandhi PA fraud : राहुल गांधींचा पीए असल्याचं भासवून काँग्रेस नेत्यांना गंडा; तिकीट आणि पदाचं आमिष दाखवून लुटले लाखो रुपये!

कपाटातून लंपास केले दागिने
प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, आरोपींनी घरातील कपाट तोडून सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते. 30 एप्रिल रोजी सकाळी भाडेकरूने उदितनगर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. चौकशीदरम्यान चोरट्यांनी कबुली दिली की, त्यांनी दागिने चोरले होते, परंतु बाहेरून लोकांनी घेरल्यामुळे निर्माण झालेल्या भीतीपोटी त्यांनी ते दागिने घरातच टाकून दिले होते. पोलिसांनी सर्व दागिने हस्तगत करून मूळ मालकाला परत केले आहेत.

अजब चोरीची सर्वत्र चर्चा
चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोरट्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी पोलिसांनाच पाचारण करण्याची ही घटना सध्या रुरकेलामध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला नसता, तर परिस्थिती चिघळली असती. सध्या या दोन्ही आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे एका मोठ्या चोरीचा प्रयत्न फोल ठरला.

हेही वाचा – Crime News: बंगालमध्ये विजयानंतर रक्ताचा सडा; भाजप आमदाराच्या भावाला निर्घृणपणे संपवलं, कोलकात्यात तणाव

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number