Anant Ambani Birthday Sea Link Lights Controversy : रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र अनंत अंबानी यांचा आज, 10 एप्रिल रोजी 31 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने मुंबईतील प्रसिद्ध वांद्रे-वरळी सी-लिंकवर (Bandra-Worli Sea Link) अनंत अंबानींच्या फोटोंसह ‘हॅप्पी बर्थडे’च्या शुभेच्छा झळकवण्यात आल्या. मात्र, मुंबईच्या या महत्त्वाच्या पुलाचे रूपांतर एका खासगी बिलबोर्डमध्ये झाल्याचे पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर या सजावटीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वसामान्यांकडून अंबानी कुटुंबावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे.
नेटकऱ्यांकडून उपरोधिक टोले
सी-लिंकवरील ही भव्य सजावट पाहून अनेकांनी सोशल मीडियावर मिश्किल आणि संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. “आता या दिवशी राष्ट्रीय सुट्टीच (National Holiday) जाहीर करून टाका,” अशा शब्दांत एका युजरने टोला लगावला. तर दुसऱ्या एकाने, “पैसा असेल तर सर्व काही उजळून निघते,” अशी कमेंट केली. अनेकांनी याला सत्तेचा आणि पैशाचा उघड गैरवापर असल्याचे म्हटले असून, “हे मुंबईकरांसाठी अत्यंत लाजीरवाणे आहे,” अशा प्रतिक्रियाही उमटल्या आहेत. दुबईतील बुर्ज खलिफाप्रमाणे सी-लिंकचा वापर केल्याने काहींनी याला “अंधेरी व्हर्जनचा बुर्ज खलिफा” असेही संबोधले.
लोकांचा सवाल – करदात्यांच्या पैशातून उभारलेल्या पुलाचा ‘असा’ वापर?
वांद्रे-वरळी सी-लिंक हा करदात्यांच्या पैशातून उभारलेला सार्वजनिक प्रकल्प आहे. अशा पुलाचा वापर एका उद्योगपतीच्या मुलाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी कसा काय केला जाऊ शकतो, असा सवाल उपस्थित केला जात आहे. “काही महिन्यांपूर्वी झालेल्या अवाढव्य लग्नसोहळ्यानंतर आता करदात्यांच्या पुलाचे रूपांतर वैयक्तिक जाहिरात फलकात करणे हा सर्वसामान्यांचा अपमान आहे,” अशी टीका ‘X’ वर एका युजरने केली. तर, एका युजरने हा सर्व ‘स्व-श्रेष्ठत्वाच्या कल्पनेचा कळस’ (Narcissism at peak) असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्याभरापासून संपूर्ण मुंबईत अनंत अंबानींच्या वाढदिवसाचे मोठे पोस्टर्स आणि बॅनर्स लावण्यात आले होते, ज्याची शहरात मोठी चर्चा होती.
VIDEO | Mumbai: Bandra-Worli Sea Link illuminated ahead of Reliance Industries Limited Executive Director Anant Ambani's birthday. Chairman & Managing Director of Reliance Industries Limited, Mukesh Ambani and Nita Ambani's youngest son, Anant Ambani, will celebrate his 31st… pic.twitter.com/0AaK4FRWFz — Press Trust of India (@PTI_News) April 9, 2026
बड्या सेलिब्रिटींनाही मिळाली आहे ही खास वागणूक
सी-लिंकवर अशा प्रकारे वाढदिवसाच्या शुभेच्छा झळकण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी शाहरुख खान आणि सलमान खान यांसारख्या बॉलिवूड सुपरस्टार्सच्या वाढदिवशीही अशा प्रकारे पुलावर रोषणाई करण्यात आली होती. मात्र, एका ‘सामान्य’ मुंबईकरासाठी, ज्याच्याकडे पैसा किंवा सत्ता नाही, अशा व्यक्तीसाठी कधी असे सेलिब्रेशन होईल का? असा भावनिक प्रश्नही एका मुंबईकर रहिवाशाने सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला आहे.
सोशल मीडियावर वादाचे मोहोळ
अनंत अंबानींच्या या 31 व्या वाढदिवसाची चर्चा केवळ मुंबईपुरती मर्यादित न राहता देशभर पसरली आहे. “व्हीआयपी संस्कृतीचा हा अतिरेक आहे,” असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. तर काहींनी ही जागा ‘पेड सर्व्हिस’ म्हणून विकली जाते की केवळ अंबानींचे पुत्र असल्याने त्यांना हे विशेष अधिकार मिळाले आहेत, असा थेट प्रश्न प्रशासनाला विचारला आहे. सध्यातरी या भव्य रोषणाईमुळे शुभेच्छांपेक्षा वादाचा प्रकाशच अधिक पडल्याचे चित्र दिसत आहे.