USS Gerald R Ford Toilet Issue : इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असून ट्रम्प प्रशासनाकडून युद्धाचे संकेत दिले जात आहेत. या पार्श्वभूमीवर इराणवर हल्ला करण्यासाठी भूमध्य समुद्रात अमेरिकेची सर्वात प्रगत आणि महागडी अण्वस्त्रवाहू युद्धनौका तैनात करण्यात आली आहे. मात्र, शत्रूशी दोन हात करण्याऐवजी या महाकाय युद्धनौकेवरील हजारो अमेरिकन सैनिकांना एका विचित्र संकटाचा सामना करावा लागत आहे. जगातील सर्वात शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या या जहाजावर सध्या शौचालयांसाठी सैनिकांना तासनतास रांगा लावाव्या लागत आहेत.
1.18 लाख कोटींच्या जहाजावर गंभीर समस्या
अंदाजे 13 अब्ज डॉलर्स (सुमारे 1.18 लाख कोटी रुपये) खर्चून बांधलेल्या ‘यूएसएस गेराल्ड आर. फोर्ड’ (USS Gerald R. Ford) या युद्धनौकेवर 4,600 लोकांची क्षमता आहे. या जहाजावर बसवण्यात आलेली ‘व्हॅक्यूम कलेक्शन होल्डिंग अँड ट्रान्सफर’ ही शौचप्रणाली वारंवार कोलमडत आहे. क्रूझ जहाजांच्या धर्तीवर कमी पाणी वापरण्यासाठी ही सिस्टिम बनवण्यात आली होती, परंतु जहाजाच्या गुंतागुंतीच्या रचनेमुळे त्यातील 650 शौचालयांच्या अरुंद पाईप्समध्ये वारंवार अडथळे निर्माण होत आहेत. एका लहान व्हॉल्व्हमधील बिघाडामुळे संपूर्ण विभागातील शौचालये बंद पडत असल्याने सैनिकांची मोठी गैरसोय होत आहे.
90 टक्के शौचालये निकामी; सैनिकांचा मानसिक तणाव वाढला
परिस्थिती इतकी बिकट आहे की, अनेकदा जहाजावरील 90 टक्के शौचालये एकाच वेळी निकामी असतात. यामुळे हजारो सैनिकांना स्वतःची पाळी येण्यासाठी किमान 45 मिनिटे प्रतीक्षा करावी लागत आहे. गेल्या 11 महिन्यांपासून समुद्रात तैनात असलेले हे सैनिक कुटुंबापासून दूर असल्याने आधीच मानसिक तणावात आहेत. त्यातच अशा मूलभूत सुविधांच्या अभावामुळे त्यांच्या शारीरिक आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहेत. इराणसारख्या शत्रूशी मुकाबला करण्यापूर्वी या सैनिकांना स्वतःच्याच जहाजावरील यंत्रणेशी लढा द्यावा लागत आहे.
BREAKING: ???? A U.S. strike on Iran faces a toilet crisis aboard the USS Gerald R. Ford with too few working bathrooms for 4,600 sailors, 45 minute lines, and a system that cannot be fixed at sea. pic.twitter.com/CC4b9XlnRb — Megatron (@Megatron_ron) February 23, 2026
हेही वाचा – Donald Trump: आधी कोर्ट, आता डेमोक्रेट्स; डोनाल्ड ट्रम्प यांना 175 अब्ज डॉलर्सचा हिशोब देण्याची मागणी
2025 मध्ये तक्रारींचा पाऊस आणि तांत्रिक मर्यादा
मिळालेल्या अहवालानुसार, 2025 मध्ये आतापर्यंत 32 गंभीर तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, एका अवघ्या 4 दिवसांच्या कालावधीत तब्बल 205 वेळा ही यंत्रणा बिघडल्याची नोंद आहे. जहाजावरील अभियांत्रिकी पथक दिवसाला 19-19 तास काम करून ही दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, भरसमुद्रात असताना ही यंत्रणा पूर्णपणे सुधारणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे. यासाठी जहाजाला पुन्हा डॉकयार्डमध्ये नेणे आवश्यक आहे, जे सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत अमेरिकन नौदलाला परवडणारे नाही.
अमेरिकन नौदलाची जागतिक स्तरावर नाचक्की
जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञान असल्याचा दावा करणाऱ्या अमेरिकन नौदलाची या समस्येमुळे मोठी नाचक्की होत आहे. शत्रू राष्ट्रावर दबाव निर्माण करण्यासाठी पाठवलेली ही युद्धनौका आता अंतर्गत तांत्रिक समस्यांमुळे चर्चेचा विषय ठरली आहे. एकीकडे अण्वस्त्रांचा धाक दाखवला जात असताना दुसरीकडे बिघडलेल्या शौचप्रणालीमुळे सैनिकांचे मनोबल खचत असल्याचे चित्र आहे. इराणवरील संभाव्य हल्ल्याच्या तयारीत असलेल्या अमेरिकेसाठी हा ‘तांत्रिक अडथळा’ केवळ आरोग्याशी संबंधित नसून तो सामरिकदृष्ट्याही चिंतेचा विषय बनला आहे.