America Attack Venezuela: जागतिक राजकारणातून अत्यंत खळबळजनक बातमी समोर येत आहे. अमेरिकेने दक्षिण अमेरिकन देश व्हेनेझुएलावर लष्करी हल्ला केला असून राजधानी कराकसमध्ये किमान 7 मोठे स्फोट झाले आहेत. रशिया टुडेच्या वृत्तानुसार, अमेरिकन हवाई दलाने व्हेनेझुएलाच्या ‘इस्ला मार्गारीटा’ बेटावरील एका सर्वोच्च लष्करी तळाला लक्ष्य करत बॉम्बहल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर व्हेनेझुएला सरकारने संपूर्ण देशात आणीबाणीची स्थिती (State of Emergency) जाहीर केली आहे.
राजधानी कराकसमध्ये कमी उंचीवर उडणाऱ्या विमानांच्या आवाजामुळे आणि भीषण स्फोटांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहराच्या दक्षिण भागात असलेल्या एका प्रमुख लष्करी तळाजवळचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. व्हेनेझुएला सरकारने अमेरिकेवर नागरी आणि लष्करी ठिकाणांना लक्ष्य केल्याचा गंभीर आरोप केला आहे. स्फोटांनंतर कराकसमधील रहिवासी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून, अनेक जण शहर सोडून सुरक्षित स्थळी जात असल्याचे चित्र दिसत आहे.
या संघर्षाची पार्श्वभूमी गेल्या काही दिवसांपासून तयार होत होती. व्हेनेझुएलाने 5 अमेरिकन नागरिकांना अटक केल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव शिगेला पोहोचला होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच इशारा दिला होता की, अमेरिकन सैन्य व्हेनेझुएलाच्या सीमेत शिरून जमिनीवर हल्ले करू शकते. अमेरिकन सैन्य सध्या ड्रग्ज तस्करी करणाऱ्या बोटींविरुद्ध मोहीम राबवत आहे, ज्याचा भाग म्हणून गेल्या आठवड्यात एका डॉकिंग क्षेत्रावर ड्रोन हल्ला करण्यात आला होता. या कारवाईमागे सीआयएचा (CIA) हात असल्याचे बोलले जात आहे.
US AIR FORCE BOMBS Venezuela's Isla Margarita island housing top army bases pic.twitter.com/2Hp5LFBA6X — RT (@RT_com) January 3, 2026
हेही वाचा – S Jaishankar: एस. जयशंकर यांचा जबरदस्त प्लॅन; पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून चिनाब नदीवर वीज प्रकल्प उभारणार
दरम्यान, व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की, अमेरिकेला व्हेनेझुएलातील सत्तापालट करायचा असून, या देशाच्या विशाल तेल साठ्यांवर ताबा मिळवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. मादुरो यांच्यावर अमेरिकेने नार्को-दहशतवादाचा आरोप लावला आहे. शुक्रवारी व्हेनेझुएलाने ड्रग्ज तस्करी रोखण्यासाठी अमेरिकेशी करार करण्याची तयारी दर्शवली होती, मात्र त्यापूर्वीच अमेरिकेने थेट लष्करी कारवाई केल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. सप्टेंबर महिन्यापासून सुरू असलेल्या संघर्षात अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या भूमीवर केलेली ही पहिलीच थेट लष्करी कारवाई मानली जात आहे.