Alandi Crime News: तीर्थक्षेत्र आळंदी परिसरात एका 6 वर्षीय चिमुरडीसह 75 वर्षीय वृद्धेची अत्यंत क्रूरपणे संपवण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. धनश्री केदारी आणि संगीता शिंदे अशी मृतांची नावे असून, या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. अज्ञात आरोपीने बोथट हत्याराने केलेल्या या हल्ल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मृत धनश्रीची आजी संगीता केदारी या स्थानिक रुग्णालयात हाऊसकीपिंगचे काम करतात. बुधवारी रात्री त्या रात्रपाळीवर कामाला जाताना आपली नात धनश्रीला शेजारी राहणाऱ्या संगीता शिंदे यांच्याकडे सोडून गेल्या होत्या. सकाळी काम संपवून परतल्यानंतर आजी आपल्या नातीला नेण्यासाठी शिंदे यांच्या घरी गेल्या, मात्र तिथे कुणीच नव्हते. त्यानंतर जेव्हा त्या स्वतःच्या घरी पोहोचल्या, तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. घरामध्ये धनश्री आणि संगीता शिंदे या दोघींचेही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
तपासासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना
घटनेची भीषणता पाहून स्थानिकांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांच्यासह गुन्हे शाखा, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि डॉग स्कॉडचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, आरोपीने अत्यंत निर्घृणपणे दोघींवर हल्ला चढवला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून काही संशयितांची चौकशी सुरू केली आहे.
हेही वाचा – Malad Crime: मालाड हादरलं! दोन गटातील वाद विकोपाला, 6 जणांवर ॲसिड हल्ला
पोलिस प्रशासनाची भूमिका
‘हे हत्याकांड अत्यंत गंभीर असून आम्ही सर्व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास करत आहोत. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून काही महत्त्वाचे धागेदोरे गोळा केले आहेत. आरोपीला पकडण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली असून लवकरच गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या जातील,’ असे आश्वासन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहे. तथापी, आळंदी पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि परिसरात शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच, काही संशयास्पद माहिती मिळाल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्यास सांगितले आहे.