Ajit Pawar Plane Crash : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात झालेले निधन ही संपूर्ण राज्यासाठी एक धक्कादायक घटना आहे. या दुर्दैवी प्रसंगाने अनेकांना काही काळापूर्वी अजित पवार यांनीच गडचिरोलीत सांगितलेल्या एका धडकी भरवणाऱ्या अनुभवाची आठवण करून दिली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज, 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीमध्ये विमान लँडिंग होत असताना झालेल्या अपघातात निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असतानाच, त्यांनी जुलै 2024 मध्ये गडचिरोली दौऱ्यात सांगितलेला एक किस्सा पुन्हा चर्चेत आला आहे. त्या दिवशी नागपूरहून गडचिरोलीला जाताना मुसळधार पाऊस आणि दाट धुके होते. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच हेलिकॉप्टरमध्ये होते. जेव्हा त्यांचे हेलिकॉप्टर काळ्याकुट्ट ढगांच्या गर्दीत शिरले आणि काही काळ भरकटले, तेव्हा अजितदादांसारखा कणखर माणूसही प्रचंड घाबरला होता. वडलापेठ येथील सभेत त्यांनी मिश्किलपणे सांगितले होते की, "विमान ढगात गेलं आणि माझ्या पोटात गोळा आला, मी इकडे-तिकडे पाहत होतो, पण शेजारी बसलेले देवेंद्रजी मात्र निवांत होते."
फडणवीसांचे ते 'सहा' अपघात आणि दिलेला धीर
त्या थरारक प्रवासादरम्यान जेव्हा अजितदादांनी आपली भीती व्यक्त केली, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना अतिशय शांतपणे धीर दिला होता. फडणवीस हसत म्हणाले होते, "दादा, घाबरू नका. माझे आतापर्यंत 6 वेळा विमान अपघात झाले आहेत, पण मी विमानात असलो की काही होत नाही." फडणवीसांच्या या विधानावर तेव्हा सभेत मोठा हशा पिकला होता. दादांनीही "ही त्यांच्या पूर्वजांची पुण्याई आहे" असे म्हणत आणखी हशा पिकवला होता. 17 जुलै च्या त्या दिवशी निसर्गाच्या कोपापुढे हतबल झालेल्या या दोन्ही नेत्यांनी अखेर सुखरूप लँडिंग केले होते, पण आजच्या अपघाताने मात्र काळजाचा ठोका चुकवला आहे.
बारामतीतील अपघाती लँडिंग
आज सकाळी जेव्हा अजित पवार मुंबईहून बारामतीकडे झेडपी (ZP) आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारासाठी निघाले, तेव्हा कोणालाही कल्पना नव्हती की ही त्यांची अखेरची सफर ठरेल. सकाळी 8:10 वाजता मुंबईतून उड्डाण केलेले हे विमान 8:50 च्या सुमारास बारामती धावपट्टीवर उतरत असताना तांत्रिक कारणांमुळे कोसळले, असे सांगण्यात येत आहे. या भीषण अपघातात विमानातील अजित पवारांसह एकूण 6 जणांचा (ज्यामध्ये वैमानिक, सुरक्षा रक्षक आणि फ्लाईट अटेंडंट यांचा समावेश होता) दुर्दैवी मृत्यू झाला. ज्या ढगांची आणि विमानाची भीती त्यांनी काही महिन्यांपूर्वी व्यक्त केली होती, तोच हवाई प्रवास आज त्यांच्यासाठी काळाचा घाला ठरला.
महाराष्ट्राचा 'दमदार' आवाज कायमचा शांत
अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक पर्वाचा अंत झाला आहे. प्रशासनावरील पकड आणि 'रोखठोक' बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले दादा अशा प्रकारे अपघाती जातील, हे कोणालाही न पटणारे आहे. गडचिरोलीतील त्या भाषणात त्यांनी मृत्यूशी झालेली ती छोटी गाठभेट हसण्यावारी नेली होती, पण आज नियतीने मात्र वेगळाच खेळ मांडला. त्यांच्या जाण्याने केवळ पवार कुटुंबच नाही, तर संपूर्ण राजकारण पोरके झाले आहे. राज्याने एक कार्यक्षम प्रशासनकर्ता आणि जनतेचा नेता गमावला असून, बारामतीमध्ये सध्या सुन्न शांतता पसरली आहे.