Airspace Ban Extension: भारत आणि पाकिस्तानमधील राजनैतिक तणावाचा परिणाम आता हवाई वाहतुकीवर अधिक गडद होताना दिसत आहे. भारताने पाकिस्तानी विमानांना आपल्या हवाई क्षेत्राचा वापर करण्यावर असलेली बंदी 24 मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या जवळपास एका वर्षापासून हे निर्बंध कायम असून, प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननेही भारतीय विमानांसाठी आपली हद्द बंद ठेवली आहे. या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील हवाई संपर्क पूर्णपणे खंडित झाला आहे.
'NOTAM' जारी; हवाई निर्बंधांचे स्वरूप काय?
प्राप्त माहितीनुसार, भारताने या संदर्भात 'नोटिस टू एअरमेन' (NOTAM) जारी केली आहे. या नवीन आदेशानुसार, पाकिस्तानमध्ये नोंदणीकृत असलेली सर्व नागरी विमाने, पाकिस्तानी कंपन्या किंवा ऑपरेटरद्वारे चालवली जाणारी कोणतीही विमाने. पाकिस्ताच्या हवाई दलाची सर्व लष्करी विमानांना भारतीय हद्दीत प्रवेश बंदी असेल. हे निर्बंध 24 मे 2026 च्या सकाळपर्यंत लागू राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याची पार्श्वभूमी
हवाई क्षेत्रावरील या बंदीला गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेला भीषण दहशतवादी हल्ला कारणीभूत ठरला आहे. 22 एप्रिल 2025 रोजी पहलगामच्या बैसारन खोऱ्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 26 निरपराध लोकांची निर्घृण हत्या केली होती. या घटनेच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त काल, बुधवारी देशभर पीडितांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या सुरक्षाविषयक चिंतेमुळे दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत.
कधीपासून बंद आहे दोन्ही देशांचे हवाई क्षेत्र?
या हवाई युद्धाची सुरुवात गेल्या वर्षी एप्रिलमध्ये झाली. भारताकडून संभाव्य लष्करी कारवाईची धास्ती घेऊन पाकिस्तानने 24 एप्रिल 2025 रोजी भारतीय विमानांसाठी आपली दारे बंद केली होती. त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून भारतानेही 30 एप्रिल 2025 पासून पाकिस्तानी विमानांना आपल्या क्षेत्रात प्रवेश नाकारला. तेव्हापासून दोन्ही देशांनी वेळोवेळी या बंदीची मुदत वाढवली आहे. विशेष म्हणजे, भारताच्या या निर्णयापूर्वीच पाकिस्ताननेही भारतीय विमानांवरील बंदी 24 मे 2026 पर्यंत वाढवली होती.
हेही वाचा – Donald Trump: ‘भारतीय म्हणजे…’; युद्धजन्य परिस्थितीमुळे सैरभैर झालेले डोनाल्ड ट्रम्प भारताविरोधात बरळले
आंतरराष्ट्रीय वाहतुकीवर परिणाम
दोन्ही देशांनी एकमेकांसाठी हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. यामुळे इंधनाचा वापर आणि प्रवासाचा वेळ वाढला असून, विमान कंपन्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. जोपर्यंत दोन्ही देशांमधील तणाव कमी होत नाही, तोपर्यंत ही हवाई कोंडी फुटण्याची शक्यता कमीच असल्याचे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे.